उजनी धरणामधून उन्हाळी हंगाम सिंचनासाठी पहिल्या आवर्तनास सुरुवात
सोलापूर - उजनी धरणामधून उजनीच्या मुख्य कालव्यामधून 14 मार्च रोजी मध्यरात्री 1.30 मि. 200 क्युसेक्स वेगाने उन्हाळी हंगामाचे सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये पहाटे 4.30 वा. वाढ करण्यात आली असून कालव्यातून 400 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये टप्प्या टप्प्याने आणखी वाढ करण्यात येणार आहे.क ालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे उजनी उजवा व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनामुळे कालवा लाभक्षेत्रामधील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.मागील वर्षी उजनी धरणाच्या कालवा लाभक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला असला तरी देखील उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विहरीच्या व बोअरवेलच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झालेली होती. पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्यामुळे विहिरी व बोअरवेल अखेरच्या घटका मोजत असताना पहावयास मिळत होते. यामुळे कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्यांकडून उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.दरम्यान उजनी धरणामध्ये 15 मार्च रोजी दुपारी 1 वाजता पाणी पातळी 495.415 मीटर, एकूण पाणी साठा 2872.81 द.ल.घ.मी, उपयुक्त साठा 1070.00 द.ल.घ.मी, तर धरणामध्ये एकूण पाणीसाठा 101.44 टीएमसी एवढा असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 37.78 टीएमसी एवढा आहे व धरणाची टक्केवारी 70.52 टक्के एवढी आहे.