Breaking News

शासकीय कार्यातूनच राज्याची आणि देशाची सेवा : आ. कोल्हे


कोपरगांव : शहर प्रतिनिधी :- शासकीय सेवेतील पदे ही जनतेच्या सेवेसाठी असतात. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदांचा योग्य वापर करावा, शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत. त्या सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात. त्यातूनच राज्याची व देशाची सेवा घडते, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने आयोजित केलेल्या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डाॅ. एम. एस. पूरकर, माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. एस. एम. घुमरे, माजी विद्यार्थी व नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश मानकर, माजी विद्यार्थी व एम. एम. आर. डी., मुंबईचे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगांवकर, माजी विद्यार्थी व म्हाडा, मुंबईचे अभियंता राकेश बोगर आदी उपस्थित होते. शासकीय सेवेतील ६० अभियंत्यांनी या माजी विद्यार्थी मेळाव्यास हजेरी लावली.

याप्रसंगी नितीन कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी विभाग प्रमुख डाॅ. पूरकर यांनी स्थापत्य विभागाची माहिती देऊन स्वागत केले. माजी विद्यार्थी दिनेश माणकर म्हणाले, की एम. पी. एस. सी. यशामागे संजीवनीने करून घेतलेली तयारीच कामाला आली. आम्ही सर्वच सर्वसामान्य कुटंबातील आहोत. परंतु ज्ञान देणारी संस्था दर्जेदार असेल तर सर्व सामान्य विद्यार्थी नक्कीच उच्च पदांवर जाऊन स्थिरावतात. सार्वजनिक बांधकाम विभागातील पैठण येथे कार्यरत असणारे अभियंता राजेंद्र बोरकर म्हणाले, २००४ च्या एमपीएससी परीक्षेत आम्ही संजीवनीचे १५ माजी विद्यार्थी एकाचवेळी शासकीय सेवेत वर्ग श्रेणी एकचे अधिकारी झालो. प्रत्यक्ष काम करताना आम्ही इतरांपेक्षा तांत्रिक ज्ञानामध्ये पुढेच असतो. आमच्या बरोबरीचे इतर अभियंते विचारतात, की हे तुम्हाला कसे येते? तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो, की हे ज्ञानामृत आम्हाला ‘संजीवनी’ने दिले. जळगांवचे कार्यकारी अभियंता, सुबोध मोरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचैळे, निळवंडे धरणाच्या प्रबंधक अभियंता संगीता खैरनार, जलसंपदा विभागाचे अभियंता सचिन ससाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. वृषाली ससाणे आणि प्रा. प्रियंका डांगे यांनी केले. प्रा. शांताराम घुमरे यांनी आभार मानले.