Breaking News

पालिका ठेकेदारात आयुक्तांसमोरच खडाजंगी

सांगली, दि. 24 - महापालिकेकडील सुशिक्षित बेरोजगार व खुल्या गटातील ठेकेदारांत आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासमोरच वाद रंगला. ठराविक ठेकेदारांनाच कामे मिळत असून निविदा मॅनेज केल्या जात असल्याचा आरोप सोसायटीच्या ठेकेदारांनी केला, तर सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारानी त्याला विरोध केल्याने वाद वाढला. त्यात महापौर हारुण शिकलगार यांनी, दोन्ही ठेकेदारांकडून दर्जेदार कामे होत नसल्याचा टोला लगाविल्याने वाद आणखीनच पेटला.
आयुक्त खेबूडकर यांनी ठेकेदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेत ठेकेदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, हॉटमिक्स ठेकेदार असोसिएशन व महापालिका ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत खुल्या गटातील ठेकेदारांनी कामाबाबत आक्षेप घेतला. पालिकेतील ठराविक ठेकेदारानाच कामे मिळत आहेत. ई टेंडर पद्धतीने निविदा काढल्या तरी त्या मॅनेज केल्या जातात. सोसायटीचे केवळ 15 ठेकेदार नोंदणीकृत आहेत. त्यांच्यात साखळी होऊन कामांचे वाटप होते. खुल्या गटात 400 हून अधिक ठेकेदार आहेत, पण या गटात कामेच नसतात. सोसायटीचे ठेकेदारांनी 50 लाखापेक्षा जादा काम केल्यास ते खुल्या गटात येतात. पण हा निकषही डावलला जात आहे, असा आरोप ठेकेदारांनी केला. यावरुन सोसायटी व सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या ठेकेदारानी आक्षेप घेतला. आयुक्तांना चुकीची माहिती देऊ नका, निविजा मॅनेज केल्या जात नाहीत, असा मुद्दा मांडला. दोघांतील वाद चांगलाच रंगला असताना, महापौर हारुण शिकलगार यांनी त्यात हस्तक्षेप केला.
दोन्ही गटाच्या ठेकेदारांनी दर्जेदार कामे केली जातात, असे छातीठोकपणे सांगावे, असे आव्हान महापौरांनीच दिले. या ठेकेदारांच्या कामाला गुणवत्ता नसते. दर्जेदार कामे केल्याचे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे, असा पलटवार केला. महापौरांच्या हल्ल्याने ठेकेदार घायाळ झाले. अखेर काही बड्या ठेकेदारांनी त्यात हस्तक्षेप करीत, आपल्यात वाद नको, असा पवित्रा घेतला. महापौरांनीही, एकमेकांची उणीदुणी काढत गेला तर सारेच बाहेर येईल, असे म्हणत दोन्ही गटाच्या ठेकेदारांना शांत केले. या वादाची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती.