Breaking News

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा वर्धापनदिन चक्क ‘सप्तपदी’मध्ये शहिद जवानांच्या कुटुंबियांचाहि झाला सन्मान

आश्वी : प्रतिनिधी :- देशासाठी लढलेल्या सैनिकांचा आगळा वेगळा सन्मान सोहळा एका विवाहाप्रसंगीअनुभवण्याचा योग संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेला आला. मुला-मुलींच्या विवाहासाठी दि. ११ फेब्रुवारी हा मुहूर्त ठरवून माजी सैनिक असलेल्या दोन व्याह्यांनी या सोहळ्यात मराठा लाईट रेजिमेंटचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील सेवानिवृत्त सुभेदार गोरख ढमक यांचा मुलगा चि. शिवराज आणि कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील सेवानिवृत्त सैनिक कैलास महाले यांची कन्या नूतन यांचा विवाह निश्चित झाला. या दोन्ही व्याह्यांनी एकमताने कर्तव्य बजावलेल्या मराठा लाईट इन्फंट्री (२१ पॅरा स्पेशल फोर्स) या बटालियनच्या वर्धापनदिनाचा दि. ११ या तारखेचा मुहूर्त विवाहासाठी मुद्दामहून निश्चित केला. देशातील मराठा जाट, डोंगरा, शीख यांची मिळवून बनलेल्या या बटालियनची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली होती. शौर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या बटालियनचे नंतर २१ पॅरा स्पेशल फोर्स असे नामांतर झाले. ईशान्य भारताच्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी ही बटालियन आजतागायत दिमाखाने पार पाडत आहे.

दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यापूर्वी झालेल्या वर्धापनदिनासाठी या बटालियनचे हिमाचल प्रदेश, राजस्थान, बंगलोर, नवीदिल्लीसह राज्यातील सुमारे २०० पेक्षा अधिक जवान आणि त्यांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे युद्धात धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. 

यावेळी वधूवरांना आशिर्वाद देण्यासाठी जिल्हा मराठा महासंघाचे नगर जिल्हाध्यक्ष लालू दळवी, कोपरगावच्या आ. स्नेहलता कोल्हे, संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जुना मराठा ग्रुपचे प्रभाकर सावंत, सुभेदार डी. वाय. गंगणवार, अंकुश चाळके, उत्तम खंडागळे, सरताज कटोच (हिमाचल प्रदेश) हेमराज चांग (राजस्थान), राष्ट्रीय कुस्ती पटू जीवाप्पा धरणीवार (बंगलोर), सुबेदार मेजर उत्तम टिका आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे, मरणोपरांत राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते भानुदास उदार यांच्या वीरपत्नी छाया आणि विठ्ठल खंडागळे यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यानंतर सुभेदार बाळू मोहरे यांनी बटालियनच्या शौर्याची ३० मिनिटाची चित्रफित दाखवून गौरवशाली इतिहासाची माहिती दिली. भारतमातेच्या जय-जयकाराच्या पार्श्वभूमीवर वाजणाऱ्या देशभक्तीपर संगीतामुळे विवाह सोहळ्याला विशेष दर्जा प्राप्त झाला. यानंतर बटालियनच्या वर्धापनदिनानिमित्ताने जवानांनी केक कापल्यानंतर वधूवरांचा विवाह सोहळा संपन्न झाला. 

दरम्यान हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुभेदार गोरख ढमक, नायब सुबेदार सुरेश प्रधान, हवालदार पी. जी. आंबरे, माऊली वर्पे, शिवाजी ढमक, इंद्रभान ढमक, अनिल पाटोळे, सतिश वलवे, प्रविण पावडे, सुभाष पाटोळे, विलास वाणी, अशोक वाणी, विठ्ठल ढमक आदींनी विशेष परिश्रम घेतले.