Breaking News

नगरपरिषद क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्याचे निर्देश

नाशिक : येवला नगरपरिषदेतील प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश आज नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहे. येवला शहरातील प्रलंबित विकासकामांसाठी आ.छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आ.जयवंतराव जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक बोलावली होती. यावेळी बोलतांना आ.जयवंतराव जाधव म्हणाले की, दि.19 जुलै 2016 रोजी केंद्र शासनाने येवला शहरातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून जवळजवळ दीड वर्षाचा कालवधी होऊनही हे काम मार्गी लागलेले नाही. 


लवकरात लवकर येथील जागेचा प्रश्‍न निकाली काढून हे काम सुरु करण्यात यावे. अन्यथा हा निधी परत केंद्र सरक ारकडे जावू शकतो. तसेच येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचा निधी वितरीत करून हे काम लवकर सुरु व्हावे. येवला नगरपालिका क्षेत्रातील यात्रास्थळ विकास कार्यक्रमासाठी अनुदान या योजनेतून राजे रघुजीबाबा स्मारक या स्थळाच्या विकासासाठी निधी मिळण्याकरिता तसेच गंगासागर तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी निधी मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याकरिता छगन भुजबळ यांनी कारागृहातून लेखी पत्र पाठवले आहे. 

मात्र नगरपरिषदेने अजूनही प्रस्ताव पाठवले नाही. त्यामुळे आ. जयवंतराव जाधव यांनी नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांची कानउघडणी करून विकासाला खीळ घातला जात असेल तर यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून येवला नगरपरिषदेच्या दिरंगाईबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी येवला नगरपरिषद क्षेत्रातील प्रलंबित असलेले राजे रघुजीबाबा स्मारकाचा प्रस्ताव आणि गंगासागर तलावाच्या पर्यावरण संवर्धनाचा प्रस्ताव लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. येवल्यातील तात्या टोपे स्मारकाबद्दल मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी सांगितले की, सदर स्मारकाचे रु 10 कोटी 50 लाखांचे काम मंजूर आहे. 

सदर कामासाठी 3 क ोटी 94 लक्ष निधी नगरपालिका स्तरावर प्राप्तही झालेला आहे. नुकतीच स्मारकाच्या जागेची अडचण दूर झाल्याने त्यांनी सांगितले. बाभूळगाव येथील सर्वे न.49 व 50 येथील 3.50 हेक्टर आर या नगरपालिकेच्या जागेवर सदर स्मारक विकसित करण्यासाठी नगरपरिषदेने एकमताने ठराव मंजूर केलेला आहे. उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी या जागेची मोजणी केली आहे. नगररचना विभागाने सदर कामाचे नकाशे मंजूर केले आहे. मंजूर नकाशाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करून मुख्यअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे तां त्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आलेले आहे. तांत्रिक मान्यता प्राप्त करून प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरच प्रस्ताव पाठविला जाईल, असे प्रतिभा पाटील यांनी यावेळी सांगितले. 

सदर कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिली. येवला नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्याची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी. यात्रास्थळ विकास अंतर्गत राजे रघुजीबाबा स्मारक विकसित करण्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून सदर कामाचा प्रस्ताव लवकर सादर करण्यात यावा. त्याचबरोबर गंगासागर तलावाच्या पर्यावरण संवर्धनाचा प्रस्ताव आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी संबधित अधिकार्‍यांना दिले. 

येवला नगरपरिषदेमधील प्रलंबीत विकासकामांबाबत भुजबळ यांनी कारागृहातून सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र तरीही कामे मार्गी लागत नसल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून बैठक घेण्याचे निर्देश दिलेले होते. सदर बैठकीसाठी नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष व सर्व गटनेते यांना आमंत्रित येऊन येथील प्रलंबीत कामे मार्गी लावावी असेही भुजबळांनी पत्रात म्हटलेले होते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी ही बैठक आयोजित केलेली होती.