Breaking News

राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम ठरतेय त्रासदायक


पाथर्डी/ प्रतिनिधी /- कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी तालुक्यातील काम रखडले असून यामुळे प्रवाशांसह विविध गावांच्या रस्त्यावरील व्यावसायिकांना त्रास होत आहे.वेळोवेळी मागणी करूनही काम सुरु होत नसल्याने. तिसगावच्या रहिवाशांनी येत्या ३ मार्चला बसस्थानकावर रस्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत युवा नेते भाऊसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माहिती देताना लवांडे म्हणाले तिसगाव, करंजी, देवराई, निवडूंगे, पाथर्डी अशी महत्त्वाची गावे रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे त्रस्त आहेत. धूळ, खड्डे, वाहतूक कोंडी, पुलांची अपूर्ण कामेे व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नको तो महामार्ग आणि नको त्यावरून प्रवास असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम चालू आहे. तिसगाव बसस्थानकापासून निंबोडी फाट्यापर्यंतचा रस्ता रखडला असून वृद्धेश्वर हायस्कूल पासून पुढे नगरच्या दिशेने रस्ता दुभाजक न टाकल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तिसगाव बसस्थानकावर तर वारंवार वाहतूक कोंडी होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते.व्यापाऱ्यांच्या दुकानात धूळ व रस्त्यावरील कचरा वाहनांमुळे दुकानात येते. श्वासावाटे धूळ तोंडात जाऊन व्यावसायिकांसह लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तिसगाव, माळी बाभूळगाव, निवडूंगे येथील पुलाचे काम अर्धवट असून त्यावर अस्तरीकरण नसल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास होतो. निवडूंगे गावाजवळील दोन्ही बाजूकडील पुलांची कामे रखडली आहेत. श्रीक्षेत्र मढी येथील महायात्रा तोंडावर आली आहे. राज्यातील भाविक मोठ्या संख्येने याच रस्त्याने येतात.