Breaking News

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे समाज कल्याण कार्यालया समोर निदर्शने.


अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांची पिळवणुक थांबवून त्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बोल्हेगाव येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले.

आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, सरचिटणीस लंकेश चितळकर, कार्याध्यक्ष गिरीश रासकर, अंजली आव्हाड, करण वाघमारे, शहेजाद खान, अन्सार सय्यद, राहुल नेटके, किरण मांडे, शेखर दंडवते, अनिकेत वडागळे, अक्षय कराळे, अतुल पाखरे, हर्षल भागवत, शाहरुख मनियार, ऋषीकेश घुले, सौरभ सारोळकर, वरुण चौधरी, गौरव गडाख, ऋषीकेश घुले, रोहित वाकडे, रविंद्र पठारे, सौरभ सारोळकर आदि सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांची परिक्षा काळात होणारी हेळसांड थांबविण्यासाठी महाएडीबीटी वर विद्यार्थ्यांनी भरलेले फॉर्म स्विकारावे व त्यांना ऑफ लाईनचे फॉर्म भरण्याची सक्ती करु नये. या अगोदर ऑनलाइन फॉर्म भरुन घेतले असताना यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप वेळ व पैसा वाया गेला आहे. आता त्यांना ऑफलाईन फॉर्म भरायला लावले जात असून, ही किचकट प्रक्रिया रद्द करावी. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहे त्यांची ऑनलाईन फॉर्मची स्विकृती करावी. पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी आर्थिक अडचण निर्माण होवू नये यासाठी मे महिन्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा फी, निर्वाह भत्ता द्यावा. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फॉर्मसाठी लागणार्‍या किचकट कागदपत्रांची अट शिथील करुन आधारकार्ड ग्राह्य धरावा. विद्यार्थ्यांच्या थकित शिष्यवृत्ती तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा कराव्यात. विद्यार्थ्यांची परिक्षा काळात धावपळ थांबविण्यासाठी मे ते ऑगस्ट दरम्यान सर्व फॉर्म भरण्याची मुदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समाज कल्याणचे विशेष अधिकारी देवीदास कोकाटे यांना देण्यात आले.