Breaking News

आगरी-कोळी युवकांनी कॅटरींग व्यवसायात उतरावे - खा. कपिल पाटील

कल्याण, दि. 17, फेब्रुवारी - आगरी व कोळी समाजाला खाद्यपदार्थांची संस्कृती आहे. या समाजातील रुचकर खाद्यपदार्थांना सर्व समाजाकडून पसंती मिळत असल्याने आगरी-कोळी समाजातील युवकांनी कॅटरींग व्यवसायात उतरावे. सध्या कॅटरींग व्यवसायात नफ्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे युवकांना फायदा होईल, असे आवाहन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केले.

कल्याण नजीकच्या मोहने येथे कोळी महासंघ व गावदेवी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या आगरी-कोळी महोत्सवाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, मुंबई व ठाण्याच्या सागरी पट्ट्याचा भूमिपूत्र असलेल्या आगरी व कोळी समाजाला सांस्कृतिक, सामाजिकबरोबरच खाद्य संस्कृती आहे. समाजातील कुटुंबात बन विल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांना पाहूण्यांची नेहमीच पसंती मिळते. तर काही ठिकाणी आगरी-कोळी खाद्यपदार्थांच्या सुरू झालेल्या हॉटेल व खानावळींमध्ये खवय्यांची रीघ लागत आहे. अमराठी खवय्यांकडून चविष्ट खाद्यपदार्थांसाठी आगरी-कोळी हॉटेल व खानावळींकडे पावले वळतात. त्याचा समाजातील युवकांनी फायदा घ्यायला हवा. सध्या बहूसंख्य समाजबांधव पारंपरिक व्यवसायांना पसंती देत आहे. पारपंरिक व्यवसायांप्रमाणेच युवकांनी कॅटरींग व्यवसाय सुरू करावेत. त्यातून दर्जेदार व रुचकर आगरी-कोळी खाद्यपदार्थ उपलब्ध करावीत त्यातून मोठा नफा होऊ शकेल.मोहने येथे सुरू झालेला हा महोत्सव रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कल्याणकरांना आगरी-कोळी समाजातील खाद्यपदार्थांची मेजवानी मिळू शकेल आ णि त्याचबरोबर समाजाच्या संस्कृतीचीही ओळख होईल.