Breaking News

दखल - मुख्यमंत्र्यांच्या कानउघाडणीनंतरही गटबाजी कायम

दररोज वेगवेगळ्या घटनांनी भाजपची डोकेदुःखी वाढत असताना वादगˆस्त वक्तव्यं करून भाजपचे नेते पक्षाची प्रतिमा आणखी मलीन करतात. नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यानं शिवाजी महाराजांविषयी वादगˆस्त वक्तव्य केलं. तो भाजपच्या तिकिटावर निवडून आला होता. खासदार दिलीप गांधी यांनी त्याला संधी दिली. असं असताना भाजपचेच खासदार अमर साबळे मात्र छिंदमचा व भाजपचा संबंध काय असं म्हणायला लागले आहेत. हा वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार म्हणावा लागेल. एकीकडं ही स्थिती असताना पिंपरी चिंचवड व सोलापूर महानगरपालिकेतील भाजपची वाढती गटबाजी पक्षाच्या दृष्टीने डोकेदुःखीचा विषय ठरली आहे. गटबाजी इतक्या थराला गेली आहे, की त्यात पक्षाच्या काही नेत्यांच्या गैरव्यवहाराची धुणी सार्वजनिक धोबीघाटावर धुतली जात आहेत, याचं भानही नेत्यांना राहिलं नाही.
मुख्यमंत्र्यांनी खडसावून ही पक्षातील गटबाजी कमी व्हायला तयार नाही. त्यामुळं पक्षात कोणी कोणाचं ऐकायचं आणि कोणी कोणाला जुमानायचं हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील गटबाजी वेळीच न थांबल्यास महापालिका बरखास्त करण्यासाठी टोकाची कारवाई करावी लागेल, असा सज्जड दम फडणवीस यांनी भरूनही पक्षांतर्गत दोन्ही मंत्री देशमुखांतील गटबाजी तशीच वाढत आहे. भाजपला पालिकेत सभागृहनेता कोण, हे ठरविता आालेलं नाही. त्यातून गोंधळ माजत एकाच वेळी दोघं आपणच सभागृहनेता असल्याचा परस्परविरोधी दावा करीत सभागृहात सूचना-प्रस्ताव मांडताना भाजपचे आणखी काय हसं होणं बाकी राहिलं, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. गेल्या 54 वर्षांच्या काँगˆेसच्या सत्तेनंतर सोलापूरमध्ये भाजपची सत्ता आली. भाजपच्या हाती सत्ता येण्यापूर्वीच केंद्र सरकारनं सोलापूर शहराची ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी निवड देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये करून सुखद धक्का दिला; परंतु सत्ता मिळूनही ती चालविणं भाजपला जमत नाही. महापालिका निवडणुकीचा निकाल लागत नाही, तोच सोलापूरकरांच्या आशेवर भाजपच्या गटबाजीच्या राजकारणानं पाणी पडलं. गेल्या वर्षी फेबु्रवारीत महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर पुढच्या महिन्यात मार्चमध्ये अर्थसंकल्प तयार करणं व तो मांडणं आणि मंजूर करून घेणं हे सत्ताधारी म्हणून भाजपला सहज शक्य होतं. अडचण झाली, ती पक्षांतर्गत उफाळलेल्या गटबाजीची. त्याअगोदरही महापौर निवडीच्या वेळी पक्षांतर्गत मानापमानाचे नाटय घडलं. बहुमत असूनही अर्थसंकल्प मांडता न येणं, इथपासून भाजपचे हसे होऊ लागले. खरं तर अर्थसंकल्प मांडून तो मंजूर करणं ही बाब सत्ताधार्‍यापेंक्षा विरोधकांसाठी अधिक गरजेची झाली होती. सत्ताधार्‍यांच्या भांडणात महापालिकेचा गाडा चालणार नाही म्हणजे विकासाची कामं थांबणार, या जाणिवेतून अखेर विरोधकांच्याच सहकार्यानं तीन महिने विलंबानं अर्थसंकल्प एकदाचा संमत झाला खरा; परंतु पुढं एकही दिवस असा गेला नाही, की सत्ताधार्‍यांत हेवेदावे झाले नाहीत. महापौर शोभा बनशेट्टी या सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाच्या तर सभागृहनेते सुरेश पाटील यांच्यासह उपमहापौर शशिकला बत्तूल व स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक हे पालकमंत्री विजय देशमुख गटाचे. त्यांच्यातील हेव्यादाव्यामुळं महापालिकेच्या कारभाराचा गाडा कधीही रुळावर आला नाही. महापौरांनी एखाद्या विषयावर आढावा बैठक बोलावल्यास, त्याकडं इतर पदाधिकारी व बहुसंख्य नगरसेवकांनी पाठ फिरवायची, तर दुसरीकडं उपमहापौर व सभागृह नेत्यांसह इतर पदाधिकार्‍यांनी स्वतंत्रपणे बैठक बोलावल्यास त्याकडं महापौरांसह सुभाष देशमुख गटाच्या नगरसेवकांनी अजिबात फिरकायचं नाही, ही पद्धतच रूढ झाली. शहराच्या विकास प्रश्‍नावर एकाच दिवशी व एकाच वेळी पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वतः स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन आपापल्या गटाचं अस्तित्व दाखवत शह-काटशहाच्या राजकारणाला खतपाणी घालण्याचं काम केलं. मुख्यमंत्र्यांनी सज्जड दम देऊनदेखील महापालिकेत भाजपमधील गटबाजी यत्किंचितही कमी न होता वाढली आहे. खासदार शरद बनसोडे यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. त्यांनी सहकारमंत्री देशमुखांना लक्ष्य केलं आहे. आपण केवळ दलित असल्यानंच आपणास त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आलं; परंतु तिथंही नवा-जुना वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीतील नेतेच भाजपत जाऊन पदाधिकारी झाले. मूळच्या भाजपच्या नेत्यांना काहीच मिळालं नाही. त्यातून स्वकीयांचा गैरव्यवहार बाहेर काढण्याचा आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्याचा सपाटा लागला. फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरीतील विविध प्रश्‍नांसाठी मुंबईत बैठक झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी प्रसिध्दीलोलुप नेत्यांना फटकारलं! पिंपरी भाजपमधील अंतर्गत वादाच्या उलटसुलट बातम्या सातत्यानं वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असल्यानं पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस यांनी शहर भाजपच्या नेत्यांना चांगलंच फटकारलं. पुण्यात इतक्या समित्या, पदाधिकारी, नेते आहेत, त्यांची कधी बातमी येत नाही. मग, उठसूठ पिंपरीच्याच बातम्या कशा येतात, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांना खडसावलं. पिंपरी पालिकेतील कारभाराच्या व अंतर्गत वादासंदभार्तील तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस व्ही. सतीश, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे, पक्षनेता एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्रदेश चिटणीस उमा खापरे बैठकीस उपस्थित होते. पत्रकार तुमचे मित्र आहेत. मैत्रीखातर त्यांना आतील गोष्टी सांगितल्या जातात. त्या माहितीचा आधार घेत ते बातम्या करतात. छोट कारण असल, तरी मोठया बातम्या प्रसिद्ध होतात. मोठं कारण असेल आणि मोठी बातमी आल्यास एकवेळ समजू शकतो; मात्र किरकोळ मुद्यांवरून मोठया बातम्या होतात. कारण नसताना तुम्ही पत्रकारांकडं जाता, म्हणून उठसूठ पिंपरी-चिंचवडच्या बातम्या येतात आणि पक्षाची प्रतिमा मलिन होते, अशा शब्दांत कोणाचाही नामोल्लेख न करता मुख्यमंत्र्यांनी फटकारलं. त्याचा परिणाम म्हणजे, या बैठकीसंदर्भात कोणीही, काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. नेहमी पत्रकारांच्या पुढं-मागं करणारे भाजप नेते त्यांच्यापासून दूर असल्याचं दाखवत होते; परंतु मुंबईतून आल्यांनतर त्यांचं पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झालं.