Breaking News

गणपतीपुळ्याच्या विकासासाठी 80 कोटी रुपयांचा निधी

रत्नागिरी, दि. 17, फेब्रुवारी - गेल्या अनेक वर्षांपासूनच्या रखडलेल्या गणपतीपुळ्याच्या विकास आराखड्याची जबाबदारी वित्त आणि नियोजन विभागाने स्वीकारली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गणपतीपुळ्याच्या विकास आराखड्याचा मुद्दा काल (दि. 15 फेब्रुवारी) वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर विभागाने 80 कोटींच्या विकास आराखड्याची जबाबदारी स्वीकारली. 


मार्लेश्‍वर पयॅटन विकासासाठीही निधी देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा वार्षिक योजना बैठक मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्याचा 670 कोटींचा पर्यटन विकास यापूर्वीच सादर करण्यात आला होता. त्यात गणपतीपुळे विकास आराखड्याचाही समावेश होता. मात्र जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आवश्यक निधीच न मिळाल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास करणे शक्य झाले नाही, असे स्पष्ट मत या बैठकीत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले. त्यानंतर विभागाक डे सादर करण्यात आलेल्या 80 कोटींच्या पर्यटन विकास आराखड्याचे जिल्हाधिकार्‍यांनी केले. गणपतीपुळ्याच्या पर्यटन विकास आराखड्यासाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात यावा, असे मत वायकर यांनी यावेळी मांडले. त्यानुसार वित्त व नियोजनमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव हाती घेण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. या आराखड्यात रस्तेविषयक सेवा, वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, सुशोभीकरण व इतर आवश्यक सुविधांचा समावेश आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्रावर नैसर्गिक धबधबा असून तेथील पर्यटन विकास आराखड्यासाठी निधी देण्यात यावा, अशी विनंती वायकर यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्याचाही विचार करून मार्लेश्‍वरच्या विकासासाठी 2 कोटी रुपये देण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच शाळा दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी देण्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी वायकर यांना दिली.