साईभक्तांची आर्थिक लूट थांबवा पोलिसांना आवाहन
साईबाबांची समाधी व साईबाबांचे दर्शन झाले, की भक्तांची मनोकामना पूर्ण होते, ही कोट्यवधी भाविकांची आजही धारणा आहे. साईनगरीत येऊन दर्शन व ध्यानधरणा करणारे भक्त वाढत आहेत. शताब्दी वर्षात मोठ्या सुविधा होतील, असे वाटत असताना संस्थानकडून भक्तांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. विश्वस्त मंडळाला ठसा उमटेल, असे काम करता आले नाही. माजी अध्यक्ष कै.जयंत ससाणे यांनी करून दाखविले कामे आजही भक्तांच्या व शिर्डी ग्रामस्थांच्या डोळ्यासामोर आहेत. संस्थानने भक्तांना मोफत चहा, पाणी, बिस्कीट दिले. प्रसादरुपी बुंदी पाकिटे दिली. शुद्ध पाणी दिले. मात्र जेव्हा भक्त प्रसादरुपी हार, प्रसादाचे ताट विकत घेतो, त्याचे भाव ऐकल्यानंतर भक्त हतबल होतो. ग्राहक करताना शिर्डीचा व्यापारी नम्र असतो. मात्र व्यवहार पूर्ण झाला त्यावेळी जेव्हा वाद होतो, तेव्हा मात्र त्याचे रूप भक्ताला कळते. अर्हताःत याला काहीजण अपवादही आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रताप इंगळे यांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केले. मात्र अजूनही साईभक्तांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी पोलीस, नगरपंचायत, साईसंस्थानने एकत्र येण्याची गरज आहे. ज्या दिवशी भावफलक आणि जागेचे भाव कमी होतील, त्या दिवशी साईभक्ताचे शोषण थांबू शकते. वाढणारे बालकामगार, भिकाऱ्यांची असलेली संख्या, पॉलिसी करणारे तरुण, आर्थिक शोषण करणारे काही रिक्षा चालक यांच्यावर जर कठोर कारवाईचे हत्यार प्रशासनाने बाहेर काढले तर शिर्डीची बदनामी थांबू शकते. त्याबरोबरच त्यासाठी साईसंस्थाननेही पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हापोलीस प्रमुखांनीच भक्तहितासाठी सेवा म्हणून हे काम मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
