Breaking News

काळे कुटुंबाने चालविला कर्मविरांचा वारसा : जगधने


कोपरगाव ता. प्रतिनिधी ;- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून माजी खा. स्व. शंकरराव काळेंनी ग्रामीण भागातील मुलींच्या दारात शिक्षणाची गंगा नेवून ठेवली. स्व. काळेंच्या निधनानंतर माजी आ. अशोक काळे आणि युवा नेते आशुतोष काळे यांनी त्याचप्रमाणे संपूर्ण काळे कुटुंबाने शिक्षणाचा हा यज्ञ अखंडपणे सुरु ठेवला. ख-या अर्थाने काळे कुटुंबाने कर्मवीरांचा वारसा चालविला आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी केले. 

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आशुतोष काळे होते.

बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, १९७५ ते १९९० या कार्यकाळात स्व. शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी पार पाडत असतांना दया, भावना, प्रेम मनात ठेवून अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर विभाग शिक्षणाच्या बाबतीत सर्वगुण संपन्न केला. कर्मवीरांची प्रेरणा घेवून काळे परिवाराने या परिसरातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय केली त्यामुळे या परिसरातील मुली खरोखर भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी भाषा, संस्कृतीचे उत्तम ज्ञान आत्मसात करा. उत्तम वक्त्याच्या ज्ञान शक्तीपुढे श्रोते नतमस्तक होतात असे सांगून महाविद्यालयात होत असलेल्या वक्तृत्व स्पर्धा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असल्याबद्दल कौतुक केले.