Breaking News

मराठी भाषेचा सर्वांगिण वापर हाच तिचा गौरव - प्रा. डॉ. शिंगोटे

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. संत ज्ञानेश्‍वरांच्या अजरामर विचारांमुळे मराठी
भाषेत आध्यात्मिक लोकशाही निर्माण झाली. मराठी ही आपली मायभाषा असून जन्मदात्री आईऐवढाच अभिमान प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी असायला हवा. मराठी भाषेतील साहित्य मातृभाषेची थोरवी वाढवणारे आहे. मराठी भाषेचा सर्वांगिण वापर झाल्यास तिचा गौरव आपोआप होईल असे मत प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी व्यक्त केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान
महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. गंगाराम वडीतके यांनी मराठी दिनाचे महत्त्व विशद करून कवी कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्यसंपदा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण मा. खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि कविवर्य कुसुमाग्रज यांचे प्रतिमापूजन तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अध्यक्षीय सूचना आफ्रिद इनामदार यांनी मांडली तर त्यास अनुमोदन आश्‍विनी गागरे हीने दिले. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा. जयश्री सिनगर, डॉ. बाबासाहेब वाणी, प्रा. राजेंद्र गाडे, डॉ. शिवाजी पुलाटे, प्रा. कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. अंकुश सूर्यवंशी यांनी राजकारण आणि मराठी भाषा याविषयावर सोदाहरण मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थी परिसंवादात सुजित मेहेत्रे, पूनम गागरे, अश्‍विनी लोखंडे, कोमल रुपवते यांनी अनुक्रमे प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा, आधुनिक कर प्रणाली जी. एस. टी, मराठीची पुर्वपिठीका आदी विषयांवर शोधनिबंध सादर केले.