कर्जवितरणात शेतकर्यांची अडवणूक करणार्या सचिवावर कारवाईची मागणी
याबाबत शेवगाव येथे सहाय्यक सहाय्यक निबंधक नागरगोजे व सहकारी अधिकारी एम. एन. घायतडक यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप बामदळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकर्यांसह शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी गंगा खेडकर, राहूल मालुसरे, प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुकाध्यक्ष निळकंठ कराड, प्रजा सुराज्यचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, संजय पवार, सोमनाथ पवार, संजय नाचन, ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र उगलमुगले, शहाराम आगळे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हंटले आहे की, भायगाव सेवा संस्थेचे सचिव मनमानी कारभार करीत असून शेतकर्यांनी गेल्या दोन वर्षांपासून लेखी निवेदने देऊन व तोंडी सचिवाविरोधात तक्रारी केल्या होत्या. परंतू आपल्या कार्यालयाने समज देऊनही सदर सचिवाकडून अल्पभूधारक शेतकर्यांसह अनेकांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात जाणिवपुर्वक अडवणूक केली जात आहे. त्यामुळे, सर्वसामान्य शेतकर्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बामदळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हा सहाय्यक निबंधक व तालुका विकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.