Breaking News

मुणगेच्या भगवती हायस्कूलचे वर्ग झाले डिजिटल

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, फेब्रुवारी - कै. बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या दातृत्वाचा वारसा पुढे घेऊन श्री भगवती हायस्कूल मुणगेचे माजी विद्यार्थी प्रशालेच्या उत्कर्षासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. या प्रशालेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्यान अनेक दाते स्वतः होऊन पुढे येतात. त्यातूनच ज्योती महाजन यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रशालेचे दोन वर्ग एकाच वेळी डिजिटल झालेत. मुलांनी अत्याधुनिक ज्ञानाचा वापर अध्ययनात करावा, असे आवाहन भगवती एज्युकेशनचे व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी या निमित्ताने केल. 


मुणगे आडवळवाडी इथल्या ज्योती अरविंद महाजन यांनी लक्ष्मीबाई भगवंत महाजन यांच्या स्मरणार्थ श्री भगवती हायस्कूल मुणगेचा सहावी आणि सातवीचा वर्ग डिजिटल करण्यासाठी आर्थिक सहकार्य केल्याने या दोन डिजिटल वर्गाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. डिजिटल सुविधेचा लाभ मुलांनी घेऊन अध्ययनात प्रगती साधावी. आणखी सुविधा या प्रशालेत पुढील काळात आपल्याकडून निर्माण केल्या जातील अशी ग्वाही यावेळी ज्योती महाजन यांनी दिली.