Breaking News

सीबीसीटीमुळे अचूक निदान शक्य : डॉ. हेमंत उमरजी


संगमनेर : तोंडाचा कर्करोग, विविध प्रकारच्या गाठी, आधुनिक इम्प्लांट, अपघातातील गंभीर स्वरुपाचे तोंडाचे, जबड्याचे फ्रॅक्चर, क्लिष्ट स्वरुपाच्या दुखापती आदीमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सीबीसीटी अर्थात ‘कोन बिम कम्प्युटराईज्ड टोमोग्राफी’ हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास शासकीय दंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हेमंत उमरजी यांनी व्यक्त केला. 
एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 1 कोटी रुपयांच्या ‘सीबीसीटी’चे लोकार्पण झाले. यावेळी डॉ. उमरजी, प्रख्यात दंतरोग तज्ञ डॉ. अब्दुल हमीद, एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. हर्षल तांबे यावेळी उपस्थित होते.

सीबीसीटीमुळे मुख व्यंगांचे अचूक व अतिसूक्ष्म निदान शक्य होणार आहे. विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रियाही अधिक अचूक व दर्जेदार करणे शक्य होणार आहे. एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयात त्यासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, हि आनंदाची बाब आहे, असेही उमरजी म्हणाले.

डॉ. हमीद यांनी, ’पूर्वीच्या सर्वच एक्स-रे मशीनवर ‘टू-डी’ इमेजेस दिसण्याची सोय होती, तर आता ‘सीबीसीटी’द्वारे ‘थ्री-डी’ इमेजेस दिसण्याची सोय आहे. त्यातच कुठलीही इमेज किंवा चित्र पाहिजे त्या कोनातून अतिशय सूक्ष्मरित्या व सखोलपणे पाहण्याची सोयही आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे या उपकरणाचा ‘एक्स-रे’ डोस पारंपरिक मशीनच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळेच रुग्णांसाठी अधिक सुरक्षित आहे,’ असे सांगितले. 

डॉ. हर्शल म्हणाले, ’विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हि आमची प्राथमिकता आहे. नवे तंत्रज्ञान आमच्याकडे शिक्षण घेत असलेल्या भावी डॉक्टरांनी अवगत करावे आणि आपल्यातील ज्ञानाच्या जोरावर समाजाची अत्यंत विश्‍वासाने सेवा करावी ही आमची भूमिका आहे. ‘सीबीसीटी’द्वारे दंत रुग्नानाही अचूक निदान आणि दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.’

दंत रुग्णांसाठी ही सुविधा अत्यल्प रकमेत उपलब्ध करून दिली जाणार आहे, एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयात यापूर्वीही अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. ‘सीबीसीटी’द्वारे आम्हाला अधिक सुरक्षित आणि दर्जेदार उपचारांची हमी रुग्णांना देणे शक्य होणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यानाही कालसुसंगत शिक्षण देणे, नवे प्रवाह आणि नवी उपचारपद्धती सोबत त्यांना अवगत करणे आम्हाला शक्य होणार आहे.

दरम्यान यावेळी सीबीसीटी तंत्रज्ञाना संदर्भाने वैद्यकीय संवाद सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध दंत महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर्स बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी एसएमबीटी संस्थेच्या शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वर्षा तांबे, मुख्याधिकारी श्रीराम कुर्‍हे, दशरथ वर्पे, संचालक ब्रिगेडियर डॉ. वसंत पवार, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, प्रशासकीय अधिकारी बाळकृष्ण देशपांडे, डॉ. महेंद्र पटाईत आदींसह एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक, डॉक्टर उपस्थित होते.