Breaking News

कर्ज देण्यास टाळाटाळ ; मॅनेजरच्या बदलीसाठी उपोषण


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी ;- पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत मागील पाच -सहा महिन्यांपासून कर्ज मागणी करूनही येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. कर्जाची नितांत आवश्यकता असताना कर्ज मंजूर करण्यास ते टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करत व्यवस्थापकाची बदली करून सदर कर्ज प्रकरण त्वरित मंजूर करावे, या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेचे पदाधिकारी सकाळपासून गांधी चौक येथे उपोषणास बसले.
येथील शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेकडे महेश म्हस्के यांनी मागील पाच सहा महिन्यांपासून पीएमईजीपीयोजनेअंतर्गत कर्ज मागणी प्रस्ताव दाखल केला होता. वारंवार विनंती करूनही बँकेचे अधिकारी कर्ज मंजूर करत नसल्याचे उपोषणार्थींचे म्हणणे आहे. बँकेत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक मॅनेजरची बदली करावी तसेच कर्ज प्रकरण त्वरित मंजूर करावे, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपोषणात सर्वश्री महेश मस्के, लहुजी सेनेचे राज्य प्रमुख बाळासाहेब बागुल, सचिव हनीफ पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाक शेख, शामकुमार श्रीवास्तव, महमूद शेख, जलील शेख आदींनी भाग घेतला.