Breaking News

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात. रत्नागिरी विभागाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद


कोपरगांव ता. प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागाच्यावतीने ‘आत्मा मालिक’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धा मोठया उत्साहत पार पडल्या. या स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वात जास्त म्हणजे २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले. पुणे व कोल्हापूर विभागाने प्रत्येकी २० पदके मिळवून द्वितीय तर रायगड विभागाने १६ पदकांसह तृतीय स्थान मिळविले. 
दि. २८ ते ३० जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत मैदानी, कुस्ती, कबड्डी, शरीर सौष्ठव या क्रिडा प्रकारांत ६७५ महिला आणि पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला. दरम्यान, स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी वित्तीय सल्लागार व मुख्यलेखाधिकारी अशोक फळणीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. यावेळी महाव्यवस्थापक माधव काळे, उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे, विभागनियंत्रक नितीन मैंद, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, विष्णुपंत पवार, बाबा बांदल आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्या खेळाडूंना पदके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुरूष गटात मैदानी स्पर्धा पुणे विभागाचे धैर्यशिल निराळे यांनी १०० आणि २०० मीटर धावणे प्रथम, ४ × १०० मी रिले अशी कामगिरी करत वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर महिला गटात अहमदनगर विभागाच्या स्वरूपा वैद्य यांनी १०० व २०० मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक मिळवत वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रिडा विभागप्रमुख अशोक कांगणे, क्रिडा शिक्षक अजित पवार, गणेश म्हस्के, सुरेश शिंदे, भूषण पाटील, रणजित लेभे, सत्येंद्र त्रिपाठी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले.