Breaking News

देवगड यात्रेत खंडेरायाच्या दर्शनाला उसळला जनसागर हजारो भाविक जेजुरी दर्शनासाठी गडावर


संगमनेर / प्रतिनिधी। तालुक्यातील प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या देवगड, हिवरगाव पावसा येथील खंडोबादेवाच्या यात्रेला आजपासून {दि. ३१} सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने भाविक आज देवाच्या दर्शनासाठी देवगड येथे आले आहेत. देवगड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदीर परिसरात सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. 
यात्रेच्या दिवशी भाविक आपल्या घरातील देव भेटविण्यासाठी गडावर आणत असतात. भंडारा खोबऱ्याची तळी भरत मंदीर परिसरात भाविक ‘सदानंदाचा येळकोट, जय मल्हार’ असा जयघोष करतात. भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते. यानिमित्त संपूर्ण मंदीर परिसर भक्तिमय झाला. गडाच्या पायथ्याला विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली. यात रेवड़ी, भेळ भत्ता, वडापाव, आईसक्रीम, लहान मुलांसाठी पाळणे, खेळण्या, महिलांसाठी उपयोगी नेकलेस, हार अशा विविध वस्तूंच्या दुकानांची येथे रेलचेल झाली.

जेजुरी गडावर दरवर्षी यादिवशी संगमनेर तालुक्यातून येणाऱ्या काठीला शिखरीचा पहिला मान दिला जातो. यासाठी दरवर्षी तालुक्यातून लाखो भाविक जेजुरी गडावर जात असतात. ज्या भाविकांना जेजुरी जाणे शक्य होत नाही, असे लोक देवगड दर्शनासाठी हमखास येत असतात. जेजुरी येथील शिखरीला संगमनेरी काठीचा पहिला मान हा शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे. तालुक्यातून लाखो भाविक जेजुरी व देवगडला जात असल्याने संगमनेर शहरात सार्वजनिक सुट्टीचे वातावरण पाहायला मिळत आहे.