Breaking News

आरोग्याबाबत महिलांची उदासिनता विकास निर्देशांकास मारक : डॉ. निमसे


प्रवरानगर प्रतिनिधी  :- भारत देशाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे आहे. मात्र असे असले तरी आरोग्याबाबत महिलांची उदासिनता ही देशाच्या मानवी विकास निर्देशांकास मारक ठरणारी आहे, अशी खंत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केली.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान आणि संगणक महिला महाविद्यालयामध्ये गृहविज्ञान विभागाच्यावतीने ‘स्त्रियांचे आरोग्य आणि पोषण स्थिती’ या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे होते. याप्रसंगी पुणे येथील चंद्रशेखर आगाशे, शारिरिकशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपाण कांगणे, सात्रळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. गोपाल रेड्डी, प्रवरा कृषि व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, डॉ. उत्तमराव अनाप आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनुश्री दुबे यांनी स्वागत केले. प्रा जया डबरासे यांनी या चर्चासत्रामागील भूमिका विशद केली.

चर्चासत्राच्या संयोजिका प्रा. कांचन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मिनाक्षी वांडेकर, प्रा. राजश्री नेहे, प्रा. संजय वाणी विद्यार्थी प्रतिनिधी नैना दरंदले आदींनी चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला. चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी सिन्नर फार्मसी महाविद्यालयातील प्रा. निशा म्हस्के, ज्योती ठाकरे, सुप्रिया शिंदे, के. एम. खर्डे, चव्हाण पी. ए, दिघे पी. के, सारिका फरगडे, डॉ. सुषमा उंडे, डॉ. तांबे आर. ए, अश्विनी कुंभार, रुपाली तांबे आदी सहभागी झाल्या.

डॉ. निमसे म्हणाले, की आज न्याय व्यवस्थेसह पोलीस, प्रशासन,संरक्षण, विमान वाहतूक आणि सैन्यदलातदेखील महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्रामीण भागाचा विचार केला तर शेतकरी कुटुंबातील दूध व्यवसायाची मदार ही ८० टक्के प्रमाणात महिलांवरच आहे. त्यामुळे यापुढे ‘हाऊस वाईफ’ ऐवजी ‘हाऊस हजबंड’ ही नवी संकल्पना ग्रामीण भागांत येते की काय, अशी परिस्थती निर्माण झाली आहे. यावेळी भारत घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेल्या ‘विद्यावार्ता’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.