Breaking News

डाक विभागात नविन संगणकीय कार्यप्रणालीस सुरवात


अहमदनगर :- अहमदनगर प्रधान डाक घर ऑफिसमध्‍ये सी.एस.आय ( कोअर सिस्टिम ईंटेग्रेशन ) या नविन संगणकीय कार्य प्रणालीचे कामकाज पूर्ण झाले असून नवीन कामकाजात या नवीन प्रणालीचा समावेश असणार आहे. या प्रणालीचे नुकतेच उदघाटन अहदमनगर डाक विभागाचे वरिष्‍ठ अधीक्षक गायकवाड यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी प्रधान डाकघरचे परिविक्षाधिन वरिष्‍ठ डाकपाल बी के राहुल, सहाय्यक डाक अधीक्षक एस एस घोडके, सहाय्यक पोस्‍टमास्‍तर बी ए बनकर, यु एच बंडगर, बी टी वाघ, आर एच लांडगे, डी एम जासूद कर्मचारी व ग्राहक मोठया संख्‍येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गायकवाड म्‍हणाले, गेल्‍या तीन ते चार महिन्‍यापासून सर्व कामकाज सी.एस.आय. या ऑनलाईन प्रणालीमध्‍ये रुपांतरीत करण्‍यासाठी सर्व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. नवीन प्रणाली अवगत होईपर्यत सुरुवातीला कर्मचा-यांना जलद गतीने काम करण्‍यास अडथळे येऊ शकतात. त्‍यामुळे ग्राहकांना थोडा त्रास होऊ शकतो. परंतू कर्मचारी वर्ग नवीन प्रणालीशी अवगत झाल्‍यानंतर सर्व कामे अत्‍यंत सोप्‍या पध्‍दतीने करता येणार आहेत. या नवीन प्रणालीचा उपयोग ग्राहकांना देखील होणार असून संपूर्ण टपालव्‍यवस्‍था म्‍हणजेच रजिस्‍टर पत्रे, स्‍पीडपोस्‍ट मनीऑर्डर इत्‍यादी सर्व व्‍यवहार आता ऑनलाईन पध्‍दतीने होणार असल्‍याने सध्‍याच्‍या व्‍यवस्‍थेमधील त्रूटी दूर होऊन ग्रहकांना तत्‍पर व खात्रीशीर सेवा मिळणार आहे. पोस्‍टमन देखील आता या प्रणालीमध्‍ये समाविष्‍ट करुन घेतले असल्‍याने टपाल वितरण अत्‍यंत बिनचूक व विनाविलंब होण्‍यास मदत होणार आहे अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.