Breaking News

'कॉमन सर्व्‍हीस सेंटर' बनणार 'आपले सरकार सेवा केंद्र' सेवा केंद्र चालकांच्या मनमानीस बसणार आळा

अहमदनगर :- जिल्हाभरात कार्यरत असलेली महा-ई-सेवा केंद्रे, सीएससी-एसपीव्‍ही सेवा केंद्र , सग्रांम केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र ( एएसएसके), सेतू केंद्र इत्‍यादी केंद्रांवरून जनसामान्यांच्या सोयीसाठी विविध योजनांची प्रक्रिया राबवली जाते. ही सर्व 'कॉमन सर्व्‍हीस सेंटर' आता 'आपले सरकार सेवा केंद्र' म्‍हणून घोषित करण्‍यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्र शासनाच्‍या सीएससीच्‍या मार्गदर्शन सूचनांनुसार राज्‍य शासनाने 19 जानेवारी 2018 रोजीच्‍या शासन निर्णयात आपले सरकार सेवा केंद्र स्‍थापन करण्‍याबाबतचे निकष, कार्यपध्‍दती व इतर बाबीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्‍या आहेत. या शासन निर्णयानुसार 'आपले सरकार सेवा केंद्रामार्फत' परिशिष्‍ट क मध्‍ये नमूद केलेल्‍या सर्व सेवा नागरिकांना देणे आवश्‍यक आहे. परिशिष्‍ट ड मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रचा बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहे. ही केंद्रे अधिसूचित केलेल्‍या ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्‍त असणार आहे. या निर्णयांमुळे जनसामान्यांची सुविधा होणार असून केंद्रचालकांच्या मनमानीस आळा बसणार आहे.