Breaking News

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

नाशिक, दि. 01, फेब्रुवारी - पेट्रोल, डिझेल, गँसचे दर कमी करण्यासाठी भाजप - शिवसेना युती सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिजेल व घरगुती गँसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात ढकलगाडीवर मोटर सायकल ठेवून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला होता. त्याप्रसंगी अ‍ॅड. रविंद्र पगार बोलत होते. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.


पेट्रोल, डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. तरी देखील भाजप-शिवसेना युती सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्‍नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ढकलगाडीवर मोटर सायकल ठेवून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले होते. तत्पूर्वी चारचाकी गाडीला दोरखंड बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी चारचाकी गाडी ओढत प्रतीकात्मक निषेध देखील केला.