Breaking News

एलईडी लाईट मासेमारी विरोधात मच्छिमार एकवटले

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, फेब्रुवारी - अनधिकृत पर्ससीन आणि हायस्पीड ट्रॉलर्सच्या अनिर्बंध मासेमारीमुळे सामान्य मच्छीमार मेटाकुटीस आला असतानाच एलईडी लाईटच्या साहाय्याने करण्यात येत असलेल्या मासेमारीमुळे एक नवीन संकट या मच्छीमारांवर उभे ठाकले आहे. शासनाने या प्रकारच्या मासेमारीवर बंदी आणली असताना ही अनधिकृत मासेमारी कारणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे सामान्य मच्छिमार संतप्त झाला आहे. या संदर्भात मालवण दांडी येथे झालेल्या बैठकीत मच्छीमारांनी संताप व्यक्त केला. 

अशा प्रकारच्या मासेमारीत अन्य एका नौकेतून जनरेटरच्या साहाय्याने एलईडी लाईटचे प्रखर झोत समुद्राच्या पाण्यात सोडले जातात. या लाईटच्या आकर्षणामुळे बर्‍याच मोठ्या परिसरातली लहानमोठी मासळी त्या ठिकाणी केंद्रीत होते. त्याचवेळी मुख्य मासेमारी नौकेवरून जाळ्यांच्या साहाय्याने हा ’कॅच’ करण्यात येतो. या मासेमारीमुळे मत्स्यबीज संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने या प्रकारच्या मासेमारीवर बंदी आणली असताना ही अनधिकृत मासेमारी कारणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे सामान्य मच्छिमार संतप्त झाला आहे. झोतातील मासेमारीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील मच्छीमारांची बैठक दांडी येथे झाली. 


या वेळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी एलईडी मासेमारीविरोधात मते व्यक्त केली आणी सामान्य मच्छिमाराना पाठिंबा दर्शविला. आमदार वैभव नाईक यांनी एलईडी मासेमारीवर कारवाई होण्यासाठी उपाययोजना आखण्यात येईल असे आश्‍वासन दिले. तर रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांनी मत्स्य व्यवसायाच्या अधिकार्‍यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान छोटू सावजी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अधिकारी एलईडी लाईट मासेमारीविरोधात कारवाई करीत नसतील तर आम्ही स्वतः समुद्रात जाऊन कारवाई करण्याचा इशारा दिला.