Breaking News

मंदिर नको, आम्हाला अंतःकरणात प्रवेश हवा - डॉ. शोभा नाईक

सिंधुदुर्ग, दि. 01, फेब्रुवारी - माणसाला माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिकविण्याचे आवाहन मराठी स्त्री आत्मकथनातून करीत असून ‘मंदिर प्रवेश नको, आम्हाला अंतःकरणात प्रवेश हवा,’ असा सर्वकालीन विचार त्यातून मांडण्यात आला आहे. आपला मराठी समाज कुठल्या-कुठल्या वळणावर थांबला आहे, याचीही साक्ष स्त्रियांच्या आत्मकथनांमधून मिळत असल्याचे प्रतिपादन विख्यात समीक्षक डॉ. शोभा नाईक यांनी येथे आयोजित नगरवाचनालयाच्या 16 व्या अप्पासाहेब पटवर्धन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.

‘स्त्रियांची आत्मचरित्रे आणि भारतीय समाज वास्तव आणि परिवर्तन’ या विषयावर मांडणी करताना डॉ. नाईक यांनी माणसामाणसात भेद करण्याचे काम पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झाले असून हंसा वाडकर, शांता हुबळीकर अशा अभिनेत्रींच्या आत्मकथनांमधून पुरुषी वृत्तीची तीव्र प्रचिती येत असल्याचेही निरीक्षण नोंदविले.
डॉ. नाईक म्हणाल्या, मराठीत पुरुष लिहिते झाले. त्याचवेळी स्त्रियाही लिहित्या झाल्या. मराठीत धाडसाने स्त्रियांनी आत्मकथन लेखन केले. बाई ही समाजात महत्वाची घटक असते पण ते मान्य करायची मानसिकता पुरुषांकडे नाही. त्यामुळेच आजवर तिला दुय्यम समजलं गेलं. पहिल्यांदा आपल्याकडे आत्मकथने आलीत, त्याला प्रोत्साहन इंग्रजांनी दिले. प्रारंभी इंग्रजांना बरे वाटावे, अशी आत्मकथने लिहिली गेली. 1910 साली रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ हे आत्मकथन आले. मात्र, अशी आत्मकथने पतीचे मोठेपण सांगण्यासाठीच लिहिली गेली. पण 1928 साली आलेल्या ‘पार्वतीबाई आठवले’ यांच्या ‘माझी कहाणी’ या आत्मचरित्रातून स्त्रियांची स्वतःची कहाणी सांगणारी कथने व्यक्ती होऊ लागली.

भेदाभेद, चळवळी, लिंगभेद अशी समाजभावना व्यक्त होणारे आत्मचरित्र आनंदीबाई कर्वे यांचे ‘माझी प्रेरणा’ असून आपला मराठी समाज कुठल्या वळणावर थांबला, याचे चित्र अशा आणि दलित स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून कळत गेला. त्या काळात जे शक्य नव्हते, ते शक्य केले असल्याचे अनेक आत्मचरित्रातून दिसून येते. पुरुषाचा साक्षीदार स्त्री असते. तिथेच स्त्राी पुरुषाला तपासता येते. स्त्रियांचे शिक्षण ही महत्वाची गोष्ट स्त्राी आत्मकथनातून दिसून येते. हंसा वाडकर, शांता हुबळीकर अशा अभिनेत्रींच्या आत्मकथनातून पुरुषी वृत्तीचे दर्शन घडते. मी पुरुषाच्या आधाराने जगते हा विचार हुबळीकर यांच्या आत्मकथनातून दिसून येतो. वाडकर यांच्या आत्मकथनातून बाईही भोगवस्तू असल्याचे पुरुष पाहत असल्याचे दर्शन घडते. अर्थात अजूनही न सांगितलेल्या गोष्टी स्त्रियांनी आपल्या आत्मकथनातून सांगायला हव्यात.

मराठीतील दलित स्त्रियांची आत्मकथने विचार करायला लावणारी असून बेबी कांबळे, उर्मिला पवार, इंदुमती जोंधळे, आशा अपराध यांच्या आत्मचरित्रातून समाजाने अनेक गोष्टी शिकाव्यात, असेच चित्र प्रकट झाले आहे. मंदिर प्रवेश नको, आम्हाला अंतःकरणात प्रवेश द्या, हा विचार अशा विचारी आत्मकथनांमधून प्रकट झाला आहे. तर दुसरीकडे सुमा करंदीकर, कमल पाध्ये, कृष्णाबाई सुर्वे, रांगिणी पुंडलिक अशा लेखिकांची संसार छान केलेली आत्मकथनेही आली. प्रास्ताविक डी. पी. तानवडे यांनी केले. महेश काणेकर यांनी आभार मानले. लक्ष्मीबाई टिळक यांचं 1934 साली आलेलं ‘स्मृतिचित्रे’ हे मराठीतील महत्वाचे आत्मचरित्र असल्याचे सांगतानाच माणसाकडे माणूस म्हणून बघण्याचे आवाहन मराठीतील स्त्रियांची आत्मचरित्रे करीत असल्याचे निरीक्षण डॉ. शोभा नाईक यांनी या व्याख्यानात नोंदविले.