Breaking News

पारनेरचे आ. विजय औटींच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला गालबोट.


अहमदनगर / प्रतिनिधी ;- पारनेर येथे शिवसेनेचे आ. विजय औटी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात गोंधळ उडाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे भाषण सुरु असतांना तालुकाप्रमुख निलेश लंकेच्या गोंधळामुळे ठाकरेंनी भाषण आवरत घेतले. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे आ. औटींच्या याकार्यक्रमाला गालबोट लागले. या गोंधळात पनेते आ. राठोड आणि जि. प. सदस्य कार्ले जखमी झाले. ठाकरे म्हणाले, आ. औटींनी सगळा तालुका भगवामय केला आहे. आता आमदारसुध्दा तेच असणार. राज्यात सेनेचाच मुख्यमंञी असणार. भाजप सरकारवर टिका करताना हेच का ‘अच्छे दिन’ असा टोला त्यांनी लगावला.
याप्रसंगी उपनेते आ. अऩिल ऱाठोड, जयश्री औटी, उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, महापौर संगीता कदम, संदेश कार्ले, काशिनाथ दाते, अशोक कटारिया, डॉ. श्रीकांत पठारे, सुरेश बोरुडे, नगराध्यक्षा सीमा औटी, नगरसेवक चंद्रकात चेडे, नगरसेवक विशाल शिंदे, जिल्हा उपप्रमुख राहुल झावरे, नगरसेवक डॉ. मुदस्सर सय्य्द, युवा शहराध्यक्ष निलेश खोडदे, नगरसेवक नंदकुमार औटी, नगरसेवक गणपत अंबुले, नगरसेवक किसन गंधाडे, महिला शहराध्यक्षा उमा बोरुडे आदी उपस्थित होते. प्रारंभी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रारंभी आ. औटी यांच्या सौभाग्यवती जयश्री औटी यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की साहेबांचा स्वभाव रागीट आहे. पण तेवढेच ते प्रेमळ पण आहेत. ते जनतेच्या सेवेला जास़्त महत्व देतात. आ. औटी म्हणाले, की शिवसैनिकांच्या प्रेमापोटी हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आला आहे. दरम्यान, आ. औटी यांचे भाषण सुरु असतानाच तालुकाप्रमुख निलेश लंके यांची समर्थकांसह ‘एन्ट्री’ झाली. यामुळे सर्वच अवाक झाले. मात्र यादरम्यान उडालेल्या गों धळामुळे आ. औटींना मनोगत आवरते घ्यावे लागले.

अभिष्टचिंतन कार्यक्रमानंतर संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, आ. विजय औटी, उपनेते आ. अनिल राठोड, जि. प. सदस्य संदेश कार्ले आदी सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घेऊन गाड्यांच्या ताफ्याकडे निघाले. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. ठाकरे हे मोटारीत बसल्यानंतर त्यांच्या पाठीमागे असणार्‍या आ. औटी यांच्या वाहनचालकांनी समोर असणार्‍या कार्यकर्त्यांच्या ताफ्यातून गाडी वेगात काढली. त्यामुळे या वाहनांचे पुढील चाक उपनेते अनिल राठोड व जि. प. सदस्य संदेश कार्ले यांच्या पायावर गेल्याने हे दोघे जखमी झाले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. काही कार्यकर्त्यांनी आ. विजय औटी यांच्या वाहनावर हल्ला करून काचा फोडल्या. दगडफेकीमुळे काही शिवसैनिक जखमी झाले. दरम्यान, दगडफेक सुरू होईपर्यंत ठाकरे यांची मोटार निघून गेली होती. मात्र आमदार विजय औटी यांच्या वाहनाला काही दगड लागले व गाडीची काचही फुटली. त्यानंतर आ. राठोड व कार्ले यांना उपचारासाठी नगरला आणले गेले. दरम्यान, शिवसेनेच्याच एका गटाने ही दगडफेक केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पारनेर तालुक्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.