Breaking News

‘व्यंकटेश’चे प्रशासन अडकले ; ‘कर्तेधर्ते’ मोकाट कसे? प्रचंड संतापलेल्या ठेवीदारांचा सवाल


जिल्ह्यातील सहकार चळवळीने राज्यासह देशाला एक चांगला आदर्श घालून दिला. मात्र नगर जिल्ह्यातच सहकाराला सुरुंग लावण्याचे ‘उद्योग’ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत. ठेवी आणि कर्जवितरणात कोट्यवधींचा ‘घपला’ केल्याने जिल्ह्यातील अनेक पतसंस्था यापूर्वीच बंद पडल्या. त्यात नेवासे तालुक्यातील सोनईच्या हलवाईगल्लीत असलेल्या व्यंकटेश पतसंस्थेची भर पडली आहे. १ कोटी ९३ लाख रुपयांच्या ठेवींमध्ये आर्थिक गडबड करणाऱ्या या पतसंस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या पतसंस्थेचे ‘कर्तेधर्ते’ असलेले संचालकमंडळ अद्यापपर्यंत मोकाट कसे, या संचालकांना नक्की कोण कोण पाठीशी घालत आहे, या ‘महाभागां’च्या संपत्तीवर टाच का आणली जात नाही, असे एक ना अनेक सवाल संतप्त ठेवीदारांमधून उपस्थित केले आहेत. दरम्यान, हे सर्व संतप्त ठेवीदार उद्या {दि. ५} जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेणार आहेत. या पतसंस्थेच्या सर्वच संचालकांची संपत्ती गोठविण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी हे जिल्हाधिकारी महाजन यांच्याकडे हे संचालक करणार आहेत.

व्यंकटेश पतसंस्थेचे तब्बल चारशे ठेवीदार आहेत. सोनईसह वंजारवाडी, वाटापूर, शिरेगाव, करजगाव, खेडले परमानंद येथील ठेवीदारांचा यात समावेश आहे. या सर्व ठेवीदारांचे या पतसंस्थेकडे किमान ६ कोटी रुपयांचे देणे आहे. पतसंस्थेने १४ टक्क्यांप्रमाणे ठेवी स्विकारल्या. सुमारे २५ लाखांचे कर्जवाटप केले. मात्र पतसंस्थीकडे ६ कोटींचे देणे असतांना या पतसंस्थेच्या बेलापूर, शिरामपूर येथील सरकारी लेखापाल श्रीमती सोमाणी यांनी अवघ्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचीच फिर्याद का दिली आणि फिर्याद देतांना पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालकमंडळाला का अभय दिले, पतसंस्थेच्या सर्वच संचालकांविरुद्ध सहकार नियम ८३, ८८ नुसार कारवाई होणार का, हे मुद्दे या ठेवीदारांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान, श्रीमती सोमाणी यांच्या फिर्यादीनुसार व्यंकटेश पतसंस्थेचे व्यवस्थापक, लिपिक आणि रोखपाल या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याचे असल्याने सोनई पोलिसांनी सदरचा गुन्हा जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. याप्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेने अद्यापपर्यंत कोणाकोणाला अटक केली, याबाबत मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुसारे यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता मोबाईल नगराच्या घरी विसरून भुसारे गावाकडे {पेण, रतनागिरी} गेल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी महाजन हे व्यंकटेश पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या तक्रारीला कितपत न्याय देतात, या पतसंस्थेच्या संचालकांची संपत्ती गोठविण्यात येणार का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्याच {दि. ५} मिळणार आहेत.