‘व्यंकटेश’च्या संचालकांची संपत्ती जप्त करा, ठेवीदारांनी दिले जिल्हाप्रशानास निवेदन.
सोनईच्या हलवाईगल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या व्यंकटेश पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकलल्या आहेत. याप्रकरणी सरकारी श्रीरामपूर येथील लेखापाल सोमाणी यांच्या फिर्यादीनुसार पतसंस्थेच्या व्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध सोनई पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संचालक मोकाट असल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या ठेवीदारांनी केली. यावेळी संजय भळगट, दतात्रय जाधव, अजय बडे, सुभाष लुणिया, रामभाऊ सुद्रिक, संजय सुद्रिक, श्रेणिक भळगट, अशोक कुलकर्णी, मकरंद जोगदे, संपत वाबळे आदींसह ४० ते ४५ ठेवीदार उपस्थित होते.
ठेवींवर काढले कर्ज
व्यंकटेश पतसंस्थेत मोठ्या विश्वासावर लोकांनी करोडोंच्या ठेवी ठेवल्या. मात्र या पतसंस्थेने यातील अनेक ठेवींवर कर्ज काढण्याचा पराक्रम केला. ठेवींवर १२ टक्के व्याज आणि कर्जावर १४ टक्के व्याज आकारण्यात आल्याचे यातील ठेवीदारांनी सांगितले. हा प्रकार म्हणजे सहकाराला तिलांजली देणारा आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने या संचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे जिल्हा उपनिबंधक आणि तालुका उपनिबंधक कार्यालयाला निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा या ठेवीदारांनी व्यक्त केली.
