Breaking News

दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळे केले : राज ठाकरे

सातारा : जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून, येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे. गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी व्यक्त केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख गुजरातचे पंतप्रधान करताना ठाकरे म्हणाले, गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळे केले आहे. 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळाले, ते येण्यासाठी किती थापा मारणार. आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल, त्याचा विचार करून पाहा. औरंगजेबाला शेवट पर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही. महाराजांचा महाराष्ट्र आज जाती-पाती मध्ये अडकलाय, नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे. तुमची मत मिळवण्यासाठी महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खात्री कडे कामाला होते का?गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्‍वास नाही, असेही ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले, विकासाच्या नाववरती नुसत्या शेतकर्‍यांकडून जमिनी ओरबडल्या जातायत. धर्मा पाटील तडफडतोय आणि मुख्यमंत्र्यांच्या अंगावर बर्फ घेतानाचे फोटो येतात. मी सत्य बोलतो. त्याचे परिणाम भोगण्यास मी तयार असतो. मात्र, मी जे बोलतो ते काही वर्षांनंतर तसेच घडते, तेव्हा माझ्या बोलण्याचे महत्त्व जनतेला कळते. मी कळवळून सांगत असतो की, एकदा तरी माझ्यावर विश्‍वास ठेवा. मला सत्ता देऊन बघा. मात्र विकासावर निवडणुका जिंकता येत नाहीत, असे वाटू लागले आहे. नाशिकमध्ये मला हा अनुभव आला आहे, असेही राज ठाकरे यांनी शेवटी बोलताना सांगितले.