Breaking News

मराठ्यांनो सावधान तुमचे अस्तित्व धोक्यात !


आज मला हे बहुजन प्रतीक पुढे राहिल का? याबद्दल शंका निर्माण होते. अनेक वर्षानंतर ओबीसी खुलेआम पद्धतीने उघडपणे ऐतिहासिक दृष्ट्याही सिद्ध झालेले सत्य सांगत आहेत की, आम्ही महाराजांच्या सैन्यामध्ये होतो, आम्ही लढलो, आमचाही स्वराज्य उभारणीत सिंहाचा नसेल कदाचित पण, खारीचा तरी वाटा आहे. आमच्या हातात शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार ही पेशवाईने काढली. आम्हाला निशस्त्र केले, जातीत बंधिस्त केले आणि आम्ही ओबीसींनी मराठ्यांसोबत भीमा कोरेगावाला महार सैन्याच्या खांद्दयाला खांदा लावून पेशवाईही उलटवली. ही भावना मराठा समाजाला कायम राखायची असेल, तर आज मराठा समाजामध्ये दोन विचारधारा प्रभावी झालेल्या दिसत आहेत. 

1. गांधीवादी हिंदुत्व मानणारा प्रवाह. 2. वैदिक हिंदुत्व मानणारा प्रवाह. वैदिक हिंदुत्त्व मानणार मराठा हा स्वतःच्या मनाप्रमाणे-मतानुसार चालत नाही. वैदिक परंपरेला मानणारे, मनुवादी संस्कृती मानणारे मिलिंद एकबोटे, भिडे यांच्या इशार्यावर ते चाललेत. गांधीवादी हिंदुत्व मानणारा मराठा स्वतंत्र आहे. तो विचार करणारा आहे. स्वतः सहिष्णुता पाळतो. पाटीलकीचीही भावना जपतो. अशा परिस्थितीत तो गप्प बसला तर वैदिक मनुवाद मानणार्या परंपरेचा मराठा पर्यायाने गांधीविरोधी समूह हा वर्चस्व मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्याचे हे वर्चस्व हे मराठा समाजापुरते मर्यादित राहील आणि तो शिवाजी महाराजांना अधिकाधिक संकुचित करत मनुवादी वैदिक परंपरेचा रक्षणकर्ता अशीच प्रतिमा उभी करत जाईल. ही प्रतिमा जशीजशी पुढे येईल तसतसे बिगर मराठा हे मराठ्यांपासून लांब जायायला सुरुवात होईल. आणि यातून मनुवादी-वैदिक परंपरा मानणारा मराठा कटपुतली सारखा वागेल आणि त्यांच्या सर्व नाड्या या मनुवादी वैदिक परंपरा मानणारे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंसारख्या लोकांकडे राहील. आतापर्यंत महाराष्ट्राचे नेतृत्व हे गांधीवादी हिंदुत्व मानणार्या मराठा समाजाकडे होते. 

कुरकूर होत होती, विरोध होत होता पण, मान सन्मानाने बोलवले तर ती कुरकूर आणि विरोध शमून जायचा. अपेक्षा एवढी होती की, आम्हाला डावलू नका आणि बाजूला सारू नका. भीमा कोरेगावाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मराठा समाजाच्या परिस्थितीमध्ये बदल होतोय का? याचा विचार केला पाहिजे. गांधीवादी हिंदुत्त्व मानणार्या मराठा समाजाने एक लक्षात ठेवले पाहिजे की, महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर महात्मा गांधी हिंदुत्ववादी आणि मनुवादी वैदिक परंपरा मानणार्यांमध्ये दंगल झाली. त्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले. अधिक नुकसान हे मनुवादी वैदिक हिंदुत्ववाद्यांचे झाले. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मनुवादी वैदिक हिंदुत्वदी विचारांचे नुसते प्रतीक नाही, तर संपूर्ण प्रतिनिधित्व करतात. त्यांनी ’आम्हाला’ 1948 साली काय सोसावे लागले याचा उल्लेख केला होता. मला ताबडतोब मराठवाड्यातल्या दंगलीची आठवण झाली. दंगल झाली हे निश्‍चित, घरे जाळली, माणसं मारली हेही निश्‍चित पण, आज 30 वर्षानंतर मराठवाड्यातल्या घटनांचा कोणी उल्लेख करत नाही. ज्यांची घरं जाळण्यात आली, मारण्यात आले त्यांचे आणि दंगलखोरांचे आताच्या कालावधीमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाल्याचे मी पाहतो. काही घटना घडल्या त्यांनी आपसात मिटवल्या आणि आज गुण्यागोविंदाने नांदत आहे. 
(क्रमशः)
- लेखक -
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष