Breaking News

मानवाच्या निरोगी आरोग्यासाठी 'सेंद्रिय शेती' आवश्यक : डॉ. नाईकवाडी

संगमनेर / प्रतिनिधी :- भारत हा कृषीप्रधान देश असून पूर्वीच्या व आजच्या काळात शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चाललेला आहे. शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन शेतीचा विकास करत आहेत. परंतु यामध्ये विषमता आढळून येते. शेतीमध्ये जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व किटकनाशकांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. परंतु, मानवाच्या आणि मातीच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतराष्ट्रीय दर्जाचे शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी केले. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ व संगमनेर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'माती, पाणी परीक्षण व खतांचे व्यवस्थापन' या विषयावर दोन दिवसीय 'शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संगमनेर तालुका कृषी अधिकारी के. ए. नवले, कृषी सहाय्यक अर्चना आंबरे, आबासाहेब भोरे, संगमनेर येथील शेतीतंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव कानवड, विद्यापीठ दत्तकगाव कोकणगाव येथील सरपंच शरद थोरात, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, बहि:शाल केद्रकार्यवाह डॉ. एन. एस. साबळे, कार्यशाळा समन्वयक प्रा. अनिल गोसावी आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, शेतकरी व शेती यांचे एक अतूट नाते असते. त्याप्रमाणे संगमनेर महाविद्यालयाचे या परिसराशी, समाजाशी तसेच शेतक-यांशी एक बांधिलकीचे नाते आहे आणि ते कायम जपले आहे. कार्यशाळा घेण्याचा उद्देश हाच आहे, की शेतक-यांनी शेतीविषयक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, शासनाचे धोरण, योजना, याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीशिवाय देशाला आणि समाजाला पर्याय नाही. 

यावेळी संगमनेर येथील तालुका कृषी अधिकारी के. ए. नवले, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, वैभव कानडे, डॉ. अशोक कडलग डॉ. आदींनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रा. अनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. आभाळे वाय. के. यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेसाठी संगमनेर तालुका परीसारातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. साबळे एन. एस. यांनी आभार मानले.