Breaking News

बहुजननामा - मोक्याच्या आणि मार्‍याच्या जागा व सामाजिक युद्ध!

प्रत्येक युगात महापुरूष निर्माण होतात. त्यांचे समकालीन असलेल्या प्रतिमहापरूषांशी त्यांचा समोरासमोरचा संघर्ष असतो. ते एकमेकांचा राग-द्वेष करतात, आपापल्या भुमिका तावातावाने मांडतात, त्यासाठी आंदोलन-प्रतिआंदोलनही करतात व कधीकधी समजदारीची भुमिका घेत एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतात. प्रस्थापित व्यवस्था आपल्या हिताची भुमिका मांडणार्‍या व्यक्तिला विचारवंत, तत्वज्ञानी, युगपुरूष, महापुरूष, महात्मा, हतात्मा अशा पदव्या देऊन गौरविते. तर विरोधी असलेल्या विस्थापितांच्या बाजूने लढणार्‍या व्यक्तीला धर्मद्रोही, देशद्रोही, अराजकतावादी, जातीयवादी, वंशवादी, बाटगा वगैरे विशेषणे लावून बदनाम करीत असते. अशा परिस्थितीत शोषित-पिडित जनता जेवढ्या प्रमाणात जागृत होते तेवढ्या प्रमाणात त्यांच्या ही महान व्यक्तींचा गौरव होतो. 

महापुरूषांचा हा गौरव नंतर अनावश्यकपणे इतक्या खालच्या स्तरावर जातो की त्यातून भजन - भक्ती सुरू होते. महापुरूष वा महान स्त्रियायांना देवत्वाचे स्वरूप प्राप्त होते. या देवत्वाचे अर्थकारण व बाजार - व्यवस्था काही मुठभर लोकांना आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मदत करते. गल्लीबोळात छोटे-छोटे मंडळ स्थापन करून उत्सव साजरे करणारी तरूणाई पावती-पुस्तके घेऊन दारोदारी फिरतांना दिसते. महापुरूषांच्या भक्तीभजनात आपलाही हाथभार लागावा म्हणून मध्यमवर्गीय लोक आपापल्यापरीने खिसा रिकामा करतात. या तरूणाईचे नेतृत्व करणारा गल्लीतील म्होरक्या लगेच नगरसेवक बनलेला दिसतो. पुढे आमदार, मंत्रीही होतो. तोच आमच्या चळवळीचा नेता ही बनतो.
प्रस्थापित ब्राह्मणी छावणीत असे घडतांना दिसते काय? काळानुसार देव बदलणारी ब्राह्मणी छावणी आपल्या जातीतून महापुरूष निर्माण होऊ देत नाहीत. निर्माण झालाच तर त्याला सरकारी महापुरूष बनवून बहुजनांच्या माथी मारतात, पण कोणत्याही परिस्थितीत ते स्वतः आपल्या डोक्यावर कधीच मिरवित नाहीत. ब्रह्मा-विष्णूला देव मानणारी ब्राह्मणी छावणी बौद्धक्रांतीला शह देण्यासाठी क्षत्रियराम - कृष्णाला देव बनवितात व बहुजनांच्या माथी मारतात. ते फायद्यासाठी एखाद्याला ‘महात्मा’ बनवितात व तोटा दिसताच त्याला गोळ्या घालून ठार ही करतात. टिळक, सावरकर, गोखले, रानडे हे कसे महान होते, हे आम्हाला शाळेत शिकवतील, पण त्यांच्या ब्राह्मणगल्ली - चौकात एकाचा ही पुतळा दिसणार नाही व घरात फोटोपण सापडणार नाही. महापुरूषांच्या जयंत्यामयंत्या साजरे करून त्यांचे नेतृत्व निर्माण होत नाही. त्यांचं नेतृत्व ते चोखंदळपणे निर्माण करतात. एक ‘कवी’ केवळ ब्राह्मण जातीत जन्मला प्रधानमंत्री झाला. आणी दुसरा एक ‘दंगलखोर’ केवळ बहुजन - ओबीसी होता म्हणून प्रधानमंत्री बनविला. प्रतिनिधिक लोकशाहीच्या दडपणाखाली बहुजन - ओबीसीतील एखाद्याने त्याला उरावर घ्यावेच लागत असेल तर तो ‘गुंड, दंगलखोर’ म्हणून भरपूर बदनाम झालेला पाहिजे तरच त्याला नेतृत्वाचे वरदान मिळते. आणी आम्ही सारे बहुजन आंधळेपणे त्यावर प्रेम करतो. हे केवळ जागृतीच्या अभावी होते. जागृत झालेले समाजही अशाप्रकारे पुन्हा झोपी जात आहेत.
अशा अ - जागृतीचे एक मोठे कारण हे आहे की, बहुजन समाज हा नेहमी ‘राजकीय’ सत्तेला प्राथमिक व अंतिम मानतो. परंतू ‘राजकीय सत्ता’ ही समाज व्यवस्थेतील इतर सत्तेच्या परिणामी मिळत असते, हे सत्य जो समाज समजून घेतो व त्याप्रमाणे काम करतो तोच समाज खर्‍या अर्थाने ‘सर्वंकषसत्ताधारी’ असतो. ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’ ही घोषणा किती फसवी होती व आहे, हे अलिकडच्या काळातील घडामोडींनी सिद्ध केले आहे. संख्येच्या बळावर कधीच सत्ता मिळत नसते. तसे असते तर मुठभर साडेतीन टक्के लोक कधीच सत्तेवर येऊ शकले नसते. पण येथे तर साडेतीन टक्केच गेल्या 3-4 हजार वर्षांपासून ‘सत्ताधारी’ आहेत. त्याची कारणे शोधली पाहिजेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, मोक्याच्या व मार्‍याच्या जागांवर आपली माणसं असलीत तर निर्णय प्रक्रिया आपल्यासाठी राबविता येते. त्यासाठी आरक्षणाचा कार्यक्रम त्यांनी घटना संमत करून राज्यकर्त्यांना राबविण्यास भाग पाडले. त्यामुळे आपली बरीच मंडळी मोक्याच्या व मार्‍याच्या जागांवर गेलीत परंतू त्यांनी आपलं व्यक्तीगत भलं करून घेण्याचा एकही ‘मोका’ सोडला नाही. बाबासाहेब जेव्हा ‘मोका व मारा’ची भाषा वापरतात तेव्हा त्यांना ‘सामाजिक युद्धाची’ भुमिका मांडायची होती. सामाजिक युद्धात जिंकल्या शिवाय खरीखुरी राजकीय सत्ता मिळत नसते. सामाजिक युद्ध न करतात हाची भाषा करणे म्हणजे भीख म्हणून काही दुय्यम सत्तापदे मिळविणे. सामाजिक युद्ध हे चळवळीतूनच उभे राहू शकते. चळवळ करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. या फौजेला बौद्धिक व जैवीक रसद पुरवावी लागते. त्यासाठी संस्था उभ्या कराव्या लागतात. त्यातून पैसा व वेळ देणारा वर्ग उभा राहतो. या सर्व गोष्टी आम्हाला माहीतच नाहीत. 
आमच्या दृष्टीने चळवळ म्हणजे जयंती-मयंती साजरीकरणे, रिडल्स, नामांतर, खैरलांजीसारख्या तात्कालिक प्रतिक्रियात्मक चळवळी करणे, फुलेवाडा (समताभुमी), चैत्यभुमी, दिक्षाभुमीच्या वार्‍या करणे. ब्राह्मणांना शिव्या देतो, परंतू त्यांच्यापासून काही शिकायचे नाही. ब्राह्मण बौद्धक्रांतीपासून बरेच काही शिकलेत. त्यामुळेच ते प्रतिक्रांती करू शकलेत. बौद्धविद्यापीठांनी प्रशिक्षित व स्वयंभू अशी बौद्धभिक्खुंची फौज निर्माण केली. या फौजेने ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेविरूद्धचे सामाजिक युद्ध जिंकले, म्हणून बौद्धक्रांती झाली. ब्राह्मणांनी हे रहस्य जाणले आणी कामाला लागलेत. त्यांनी कोणती कामे केलीत ते आता पुढच्या भागात पाहू या!