Breaking News

डीएसके यांना तूर्तास दिलासा बुलडाणा अर्बन बँक धावली मदतीला

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मदतीला आता बुलडाणा अर्बन बँक धावून आली आल्यामुळे, डीएसके यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. बुलडाणा अर्बन बँक डीएसके यांना 100 कोटींचे कर्ज देण्यास इच्छुक आहे. तसेच त्यांची विकण्यास योग्य असलेली 12 
कोटींची संपत्तीही विकत घेण्यास उत्सुक असल्याचेही बँकेच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले.


मुंबई उच्च न्यायालयातील डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला असून, 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय यावर आपला अंतिम फैसला सुनावणार आहे. दरम्यान मंगळवारी अखेरच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णींना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणार्‍या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले. इतके दिवस जी मागणी केली नाहीत ती आता शेवटी का करताय? असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला.दरम्यान, कबुल केल्याप्रमाणे आजच्या सुनावणीतही डी. एस. कुलकर्णी 50 कोटी जमा करण्यात अपयशी ठरले. मात्र उच्च न्यायालयाने यावर काही बोलायच्या आतच डी. एस. कुलकर्णींच्या वतीने बुलडाणा अर्बन बँकेचा प्रस्ताव कोर्टापुढे ठेवण्यात आला. यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, हा प्रस्ताव प्रभुणे इंटरनॅशनलच्या आश्‍वासनाप्रमाणे फोल ठरु नये यासाठी आमच्यासमोर ठोस पुरावे सादर करा.
17 फेब्रुवारीपर्यंत बुलडाणा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात डीएसकेंबाबतचा ठराव संमत केल्याचे पत्र तपास यंत्रणा या नात्याने पुणे ईओडब्ल्यू आणि उच्च न्यायालयाला 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करा, असे निर्देश बुलडाणा अर्बन बँकेला देण्यात आले आहेत. दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीत डी. एस. कुलकर्णी हे आपली पत्नी हेमंती यांच्यासह जातीने कोर्टापुढे हजर होते. या दोघांव्यतिरीक्त त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.