Breaking News

दोषी व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष कशी? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल


नवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती राजकीय पक्षाचे अध्यक्षपद सांभळत असेल तर ते चिंताजनक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. अशी दोषी व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष कशी होऊ शकते असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या राजकीय नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हे मत नोंदवले. ज्या राजकारण्यांना गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे त्यांना निवडणूक लढर्‍यास बंदी असते. तरीही एखादी व्यक्ती पक्ष स्थापन करुन त्याचा अध्यक्ष कशी काय होऊ शकते? लालू प्रसाद यादव, शशिकला यांच्यासारखे नेते पक्षाचे अध्यक्ष कसे राहू शकतात? असे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरोपी असलेल्या राजकारण्यांच्या अध्यक्षपदावरुन चिंता व्यक्त केली. दोषी व्यक्ती अध्यक्ष असलेल्या पक्षातील लोक सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.निवडणूक आयोगाच्यावतीने अमित शर्मा यांनी बाजू मांडताना म्हटले की,‘1998 पासून निवडणूक आयोग कलंकित राजकारण्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा राजकारण्यांवर बंदी घालण्याचा अधिकार आयोगाला नाही. लोकप्रतिनिधी कायद्यात दुरूस्ती झाल्यास यावर आयोगाला कारवाई करता येईल.