Breaking News

अल्पवयीन शाळकरी पुतणीवर अत्याचार

जामखेड :- जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथील खंडोबानगर परिसरात राहणार्‍या परप्रांतीय इसमाने आपल्याच अल्पवयीन शाळकरी पुतणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीविरुद्ध बाललैंगिक आत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील खंडोबावस्ती परिसरात राहणार्‍या परप्रांतीय आरोपी राजकुमार गामाप्रसाद शर्मा (वय 37 ) याने आपल्या मावसभावाच्या शाळकरी अल्पवयीन मुलीला फिरायला जायचे असे सांगून, दि 20 जानेवारी रोजी सौताडा ता. पाटोदा येथील वनविभागाच्या बागेत घेऊन गेला. यावेळी, त्याने तु मला खुप आवडतेस म्हणत तिच्या इच्छेविरुद्ध आत्याचार केला, ही बाब जर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पिडीतेला दिली.
यावेळी घाबरलेल्या पिडीत मुलीने ही घटना घरात कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर आरोपी राजकुमार याने पिडीत मुलीला तूझी चूलती आजारी असून, तिला दवाखान्यात घेऊन जायचे असून, तू बरोबर चल असे सांगत तिला खंडोबानगर परिसरातील आपल्या घरी घेऊन गेला. तेथे गेल्यावर घरात कोणीही नसल्याचे पाहून पिडीत मूलीने गांगरून जात चूलती कुठे आहे असे विचारले, मात्र आरोपीने तिचे काहिही न ऐकता तिला घरात घेऊन गेला अन् तिच्यावर पुन्हा एकदा बळजबरीने आत्याचार केला. 

ही घटना दि. 30 जाने रोजी सकाळी 11 वा घडली. पिडीत मूलीने चुलत्याचा आत्याचार सहन न झाल्याने घडलेली घटना वडिलांना सांगितली. पिडीत मूलीचे वडील घाबरून जाऊन विचार करत दोन दिवस घरातच बसून राहिले. शेवटी घराशेजारी राहणार्‍या समजदार व्यक्तीस घडलेली गंभीर घटना सांगितली, त्या व्यक्तीने पिडीत मुलीस व वडील यांना सरळ पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले. 

पिडीत मूलीचे वडिल राजेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैगिक आत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत. सदर घटना उघडकीस आल्याने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.