Breaking News

डॉ.सुजय विखेंच्या दक्षिणायनाला प्रारंभ ! जनसेवा फाऊन्डेशनच्या बॅनरखाली केला लोकसभेचा श्रीगणेशा !


ज्यांच्या राजकीय संक्रमणाचे कुतुहल संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्याला लागले होते. त्याची सुरुवात २० जानेवारीला झाली. सुर्याच्या उत्तरायणाला नुकतीच कुठे सुरुवात होत असतानाच डॉ.सुजय विखे पाटील यांच्या दक्षिणायणाला प्रारंभ झाला.
डॉ.विखे लोकसभेच्या निवडणूकीचा प्रारंभ नेमका कशा पद्धतीने करतील. याबाबत तमाम जनतेची उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेर आज तिला पुर्णविराम मिळाला. आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या या युवा नेत्याने, सर्वरोगनिदान शिबीर आयोजीत करत आपल्या घराण्याच्या सामाजिक जिव्हाळ्याच्या परंपरेचीच री ओढली. मुंबई ते पाथर्डी हेलिकॉप्टरने प्रवास करून कोरडगांव येथील शिबीरस्थळाकडे प्रयाण करत असताना, बाबुजी आव्हाड महाविद्यालय व पाथर्डीच्या चौकाचौकांसह, वाळुंज आगसखांड, टाकळीफाटा व कोरडगांव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

कोरडगांव येथील शिबीराचे उद्घाटन झाल्यावर त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात, शिबीरात देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या सूचना देताना राजकीय भाष्य करण्याचे हेतुपुरस्सर व कटाक्षाने टाळले. असे असले तरी नगर दक्षिणेतून ते लोकसभेची निवडणूक लढवणार, हे लपून रहात नाही. शनिवारच्या दौऱ्यात त्यांनी कोरडगांव गण अक्षरशः पिंजून काढला. प्रत्येक गावातून त्यांच्या भेटीला आलेल्या रहिवाशांचे गाऱ्हाणे त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले. 

त्यावर उताराही योजला. त्यांच्या या पद्धतीमुळे गावागावांतून आलेला आबालवृद्ध त्यांच्याकडे आकर्षित झाला. तरूण कायकर्ते मोहोळाप्रमाणे त्यांच्याभोवती घोंगावत होते. यावरुन आतापासूनच लोकांनी त्यांना स्विकारायला सुरुवात केल्याचे जाणवले. कार्यकर्त्यांच्या उत्साहाची नांदी, निश्चितच त्यांना सुखावून गेली असणार यात तिळमात्र शंका नाही.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ७५ शिबीरांचे आयोजन केले असल्याची माहिती देताना, शिबीरांत देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. सर्वरोगनिदान शिबीरांच्या माध्यमातून ते जनसंपर्क प्रस्थापित करणार असल्याचे निदर्शनास येते. सेवाभावी वृत्ती जोपासत राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्याची अतिशय योग्य भूमिका त्यांनी घेतली आहे. 

कारण या माध्यमातून रुग्ण,त्याचा परिवार व कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येणार असल्याने यातूनच व्यापक प्रमाणावर जनसंपर्क साधला जाणार आहे. यातून, साहजिकच प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रचाराची पहिली फेरी साधली जाणार आहे. या काळात ते राजकीय भाष्य करणार नसले तरी, लोकांशी त्यांचा जवळून परिचय होण्याचे महत्वाचे कार्य पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेची देखील जोड असणार आहे.

व्यासपिठावर राजकीय भाष्य जाणूनबुजून टाळायचे व पत्रकार परिषदेतून केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा संदेश लोकांत पोहचविण्याची नामी युक्ती त्यांनी शोधून काढली आहे. शिबीरांच्या माध्यमातून जनसंपर्क आणि पत्रकारांच्या माध्यमातून अजेंडा प्रसारित करत जनसेवा फाऊंडेशनच्या बॅनरखाली पहिली प्रचारफेरी पूर्ण करायची. तोपर्यंत कोणत्या तिकिटावर निवडणूक लढायची हे फायनल झालेले असेल. 

असा बेरकी पवित्रा त्यांनी घेतला आहे. व यामध्ये ते यशस्वी होताना दिसून येत आहे. कोरडगांव येथील त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून तेच अधोरेखीत होते. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीची वांझोटी घोषणा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवछत्रपतींच्या स्मारकांचे झालेले फक्त भूमिपूजन, कर्जमाफी व संजय गांधी योजनेचे शून्य टक्के फलित, घरकुले आदि विषयांच्या शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

राजकीय आखाड्यात ते अनाहूतपणे उतरले नसून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद भुषविण्यापासून आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास व यशस्विता थक्क करणारी आहे. 'मी फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच लढत असतो.' हे त्यांचे आत्मविश्वासाने भरलेले वाक्य म्हणूनच विश्वसनीय ठरते. पद्मविभूषण कै.बाळासाहेब विखे पाटील यांना प्रत्यक्ष ओळखणाऱ्या पिढीला ते बाळासाहेबच भासतात. आणि आजच्या युवा पिढीला ते सुजयदादा वाटतात. 

 कै.लोकनेते बाळासाहेब विखे पाटील हे लोकोत्तर नेते होते. नगर दक्षिणेतून ते एकदा खासदार झाले होते. त्याच टर्मला त्यांनी केंद्रात अवजड उद्योगमंत्रीपदही भुषविले होते. तेव्हापासून आजपर्यंत एक मोठा कालखंड गेला असला, तरी विखे पाटील हे नांव व विखे पॅटर्न याविषयी दक्षिणेला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. याच विखे पॅटर्नला आता डॉ.सुजय विखे पाटील यांच्या रुपात ताज्या दमाचे नेतृत्व मिळाले आहे. ते दक्षिण दिग्विजयासाठी कटिबद्ध झाले असून त्यांची घोडदौड मोठ्या जोमात सुरू झाली आहे.

पाथर्डी तालुक्यासाठी, पद्मविभूषण कै.बाळासाहेब विखे पाटील, महाराष्ट्र राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शालिनी विखे पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. वांबोरी चारीचा प्रश्न हा दीर्घकाळ फक्त प्रश्नच बनून राहिला होता. त्याला मूर्त स्वरुप विखे पितापुत्रांनी दिले. पाथर्डीच्या वैभवात भर घालणाऱ्या पंचायत समितीच्या दिमाखदार इमारतीला निधी देताना ना.शालिनी विखे पाटील यांनी हात सैल सोडला. आता त्यांचाच वारसा निरंतर पुढे चालविण्यासाठी डॉ. सुजयदादा विखे पाटील कटिबद्ध झाले आहेत.