Breaking News

सिद्धिविनायकाच्या भाविकांचे सिध्दटेकला हाल देवस्थानासह प्रशासनाचे दुर्लक्ष.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे शनिवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांची सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. मात्र प्रशासन व चिंचवड देवस्थानच्या दुर्लक्षामुळे भाविकांना या ठिकाणी असुविधेचा सामना करावा लागला.


पहाटे सिद्धिविनायकाची महापूजा झाली.पहाटेपासूनच भाविकांचा सिद्धटेककडे ओघ सुरू होता. मात्र सकाळी 8 वा. पासून गर्दी वाढत गेली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापकांकडून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली, तरीही नियोजनाच्या अभावामुळे भाविकांची असुविधा झाल्याचे दिसून आले.

दर्शनासाठी भाविकांच्या दूरवर रांगाच रांगा दिसून येत होत्या. रस्त्यावर आणि रांगेदरम्यान बॅरिकेट्स लावले असले तरीही पोलिस यंत्रणेच्या अभावामुळे अडचणी येत होत्या. सायंकाळी 4 वा. नंतर गर्दीत भाविकांची गर्दी वाढत गेली. मंदिरासमोरील वडाच्या झाडाभोवती व्यवसायकांची अतिक्रमणे जैसे थे असल्याने भाविकांना बाहेरही गर्दीचा सामना करावा लागला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सिद्धटेक येथे भाविकांची गर्दी कायम होती. मात्र नियोजनाअभावी भाविकांना असुविधेचा फटका सहन करावा लागला.त्यामुळे भाविकांकडुन नाराजी व्यक्त करण्यात आली.

सिद्धिविनायक मंदीरासमोरील प्रांगणात दगडी फरशी बसविलेली आहे. दोन्ही बाजुंनी अतिक्रमण केलेली दुकाने आहेत. मोकळ्या जागेवर मात्र छत, शेड, मंडप असे काहीच नसल्याने उन्हाच्या तीव्रतेने फरशी प्रचंड तापते. मंदीर परिसरात भाविक पादत्राणांचा वापर करत नाहीत. त्यामुळे भाविकांना पायाला चटके सोसत मंदीर परिसरात वावरावे लागत आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी देवस्थान विकासासाठी वर्ग झालेला असताना भाविकांची गरज असलेल्या छताचे काम मात्र अद्यापही झालेले नाही.