Breaking News

कर्जत तालुक्यापासून महिला सक्षमीकरणाची सुरूवात करणार - डॉ. सुजय विखे

जनतेला आपली गरज असेल तर जनता आपल्याला निवडेल. मात्र निवडणुकीबाबत आपण अद्यापि काहीही ठरवलेले नाही. चांगले काम करत राहिले पाहिजे. यासाठी तालुक्यातील बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा विकास करण्याच्या योजनेंतर्गत कर्जत महोत्सवाचे आयोजन केले आहे. तालुक्यात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती सुजय विखे यांनी पत्रकाराशी दिलखुलास बोलताना दिली. 


लेक वाचवा अभियानांतर्गत कर्जत येथे सक्षम महिला कर्जत महोत्सव 2018 चे आयोजन शनिवार दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान केले आहे. या महोत्सवाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सुजय विखे यांनी कर्जत येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती देत मनमोकळ्या गप्पाही मारल्या. जनसेवा फौडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कर्जत महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन भरणार आहे. बचतगटाचे खाद्यपदार्थाचे स्टॉल याठिकाणी लागणार असून यासाठी 130 स्टॉल पंचायत समिती, महिला विकास महामंडळ यांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहेत. तीन दिवसीय कार्यक्रमात दि. 24 फेब्रु रोजी कर्जत तालुक्यात विशेष कार्य करणार्‍या महिलांचा गौरव सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते केला जाणार आहे. दि. 25 फेब्रु रोजी तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तर दि. 26 फेब्रु रोजी या महोत्सवास उपस्थित राहणार्‍या लोकामधून 11 लोकांना लकी ड्रॉद्वारे वेगवेगळी बक्षीसे दिली जाणार आहेत. यावेळी डॉ. मिर्झा बेग यांचा हास्याचे फवारे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वत: डॉ. सुजय विखे यांनी दिली. या प्रदर्शनात ज्वेलरी, खेळणी, शोभेच्या वस्तू, रेडीमेड गारमेंट, घोंगडी, चिक्की, विविध चटण्या, बेकरी उत्पादने, महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच शेती विषयक तंञज्ञान उपलब्ध होणार असून हा सर्व कार्यक्रम मोफत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन डॉ. सुजय विखे यांची आहे. कर्जत येथे डॉ. सुजय विखे यांनी आपले संपर्क कार्यालय सुरु करणार असून, त्याचे उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे हस्ते होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जनतेची कामे केली जाणार असून रेशनकार्ड व संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे. अशी माहिती देताना यानिमित्ताने आम्ही जिल्ह्यातील दक्षिणेत प्रथम कर्जत तालुक्यापासून अशा पद्धतीच्या महिला सक्षमीकरणाची सुरुवात करत आहोत. यापुर्वी राहात्यामध्ये असे कार्यक्रम घेतले आहेत. यातून पुढे येणार्‍या उत्कृष्ट गटांना प्रवरा बँकेमार्फत कर्ज पुरवठाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना मोठ्या मनाने जनतेची कामे केली पाहिजेत. जे लाभ मिळायचे ते मिळणारच आहेत. येथे जनतेने गर्दी केली, तर तालुक्यातील महिलांनाच त्याचा फायदा होणार असून प्रथम त्याचा फायदा झाला. तर शेवटी माझा फायदा होणारच आहे असे सूचक वक्तव्य करत आपण सध्या तरी जिल्ह्यात जिल्हा विकास आघाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवायची हे अध्यापी ठरवलेले नाही. जर जनतेने जबाबदारी दिली तर नक्की ती समर्थपणे सांभाळू असे म्हणत माझ्या कुटुंबीयाने जिल्ह्यासाठी खूप काही केले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी व प्रत्येकासाठी आम्ही काय काय केले आहे, याचा लेखाजोखा आपल्याजवळ आहे, वेळ आली तर तो सविस्तर मांडणार आहे. मात्र जिल्ह्यातील दक्षिण भागात विकासाचा 15 वर्षाचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे. ती जबाबदारी खूप मोठी आहे. त्यासाठी आपण सर्वच तालुक्यात विकासाच्या विविध कार्यक्रमांना प्राधान्य देणार आहोत. या महोत्सवाच्या निमित्ताने आपण जनतेची कामे करणार आहोत. मी रात्रीच्या वाटपामध्ये विश्‍वास ठेवत नाही, तर दिवसा वाटतो असे म्हणत अहमदनगर दक्षिणमध्ये खासदारकी लढविण्याचे मनसुबे अप्रत्यक्षपणे व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, दादा सोनमाळी, कैलास शेवाळे, तात्या ढेरे, डॉ. संदीप बरबडे, श्रीहर्ष शेवाळे, बापूराव गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर त्यांनी महोत्सवाच्या तयारीची देखील पाहणी केली.