Breaking News

मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने सामुदायीक विवाह सोहळा.

संगमनेरच्या सामाजिक जीवनाशी एकरुप झालेल्या मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने २५ एप्रिलरोजी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरीकांसाठी असून यात विवाहबध्द होणाऱ्या नवदाम्पत्यास संसारोपयोगी वस्तु भेटस्वरुप दिल्या जाणार आहेत. अवघा एक रुपया शुल्क भरुन ह्या सोहळयासाठी नावनोंदणी करता येईल अशी माहीती युवा उद्योजक मनिष मालपाणी यांनी दिली. 


मालपाणी उद्योग समूहातील कामगार व संगमनेर तालुक्यातील नागरीकांसाठी गेल्या २० वर्षांपासून हा दिमाखदार सोहळा आयोजित केला जातो. संगमनेर तालुका डोंगरी असल्याने पावसाच्या लहरी स्वभावाचा येथे नेहमीच फटका बसतो. सातत्याच्या अवर्षणाने जेमतेम मिळणारे शेतीचे उत्पन्न आणि त्यातच आपल्या उपवर मुला-मुलींचे लग्नकार्य यामुळे सर्वसामान्य माणसाला कर्जाशिवाय अन्य पर्याय राहत नाही. लग्नातील मानपान, देणे-घेणे यासाठी वधुपित्याचा मोठा खर्च होतो. यासर्व गोष्टींना सामुदायीक विवाह सोहळयासारख्या कार्यक्रमातून फाटा दिला जाऊ शकतो.

मालपाणी उद्योग समूहाद्वारा दरवर्षी आयोजित होणाऱ्या या भव्यदिव्य सोहळयाचे नेटके नियोजन केले जाते. विविध जाती-धर्माच्या प्रथापरंपरानुसार विधींची व्यवस्था असते. वधु-वरांसाठी स्वतंत्र कक्ष, पाहुणे मंडळींसाठी बैठकीची व्यवस्था, शाही पध्दतीने सजवलेला विवाह कक्ष, एकाचवेळी शेकडों पाहुण्यांची भोजनव्यवस्था, वाजत-गाजत निघणारी शाही वर मिरवणूक अशा विविध कारणांनी हा सोहळा दिमाखदार म्हणून संगमनेरकरांमध्ये परिचयाचा आहे. या सोहळयात सहभागी होणाऱ्या वधु-वरांकडून अवघा एक रुपया नोंदणी शुल्क घेतले जाणार आहेत. यात वरासाठी विवाहाचा पेहराव, फेटा व उपरणे तर वधुसाठी साडी, ओढणी व मुंडावळया उद्योग समूहाकडून दिले जाणार आहे. याशिवाय विवाहबध्द होणाऱ्या प्रत्येक दाम्पत्यास स्टिलचे कपाट, पलंग, गादी व संसारपयोगी भांडी भेटवस्तु म्हणून दिल्या जाणार आहेत.