सात्रळ दुध केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा.
नैसर्गिक स्वादासाठी स्वच्छ व ताजे दुध म्हणून जिल्ह्यासह राज्यात नावाजलेल्या सात्रळ येथील दुध प्रक्रिया व पॅकिंग करणार्या सात्रळ डेअरी व त्यास दुध पुरवठा करणार्या दुध संकलन करणार्या केंद्रावर अहमदनगरसह नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी धाड टाकली. त्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या जीवाशी संबंधीत असलेल्या या प्रश्नाने या घटनेबद्दल समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, सात्रळ येथे राज्यात गुणवत्तापुर्वक दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सात्रळ येथील दुध प्रक्रिया व पॅकिंग युक्त दुध पुरविणार्या सात्रळ दूध आणि त्यास दूध पुरवठा करणार्या दुध संकलन करणार्या केंद्रावर दुधात भेसळ होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार अधिकार्यांनी या सात्रळ दुध केंद्रास दुध पुरवठा करणार्या पाथरे येथील दुध संकलन केंद्रावर सकाळी धाड टाकली. सदर दुध संकलन केंद्राच्या शेडमध्ये दुध भेसळीची केमिकल पावडर तसेच कमी गुण प्रतीचे दुध आढळून आले. यानंतर पाथरे येथील दुध संकलन केंद्रावर सापडलेली पावडर व दुध जप्त करत त्यांनी आपला मोर्चा सात्रळ येथील दुध डेअरीकडे वळविला. सात्रळ दुध डेअरीवर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. यात परिसरातून दैनंदिन गोळा होणारे दुध तपासण्यासाठी आवश्यक असणारी ठोस रासायनिक प्रयोगशाळा या डेअरीवर उपलब्ध नाही. कित्येक वर्षापासून ही सात्रळ डेअरी राज्यात परराज्यात नागरिकांना नैसर्गिक स्वच्छ व ताजे दुध असल्याचे सांगत ग्राहकांना आकर्षित करते, परंतू जर या डेअरीकडे दुध स्वच्छ आहे की भेसळयुक्त हे ओळखण्याची ठोस यंत्रणाच (प्रयोगशाळा) नाही, मग या सात्रळ डेअरीचे आजपर्यंतचे दुध स्वच्छ व निर्भेसळ कसे? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार सात्रळ डेअरीला दिला कोणी ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर या सात्रळ डेअरीत संपूर्ण डेअरी परिसरात अस्वच्छता, असुरक्षित प्रयोगशाळेत पडलेला टाकाऊ माल, केमिकल व लुब्रीकंट चे रिकामे ड्रम संबंधीत अधिकार्यांना आढळून आले. यावेळी लक्षात आलेली विशेष बाब म्हणजे दुध पॅकिंग पिशवीवर एक दिवस पुढची उत्पादित केलेली तारीख आढळून आली. तसेच या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी एकाच दिवशी केलेल्या कारवाईत पाथरे येथील दुध संकलन केंद्रावर जमा झालेले कमी प्रतीचे दुध व पावडर या अधिकार्यांना सापडते. त्याचे संशयावरून अधिकारी नमुने घेतात. त्यातील काही दुध हे नष्ट केले जाते. हे जर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी एका कारवाईत करतात तर मग हे दुध सात्रळ दुध डेअरी स्विकारते कसे ? ही सात्रळ दुध डेअरी जे दैनंदिन हजारो लिटर दुध गोळा करते ते शुद्ध कसे व हे दुध शुद्ध आहे की नाही हे तपासण्याचे काम सात्रळ डेअरी चालकाचे होते. त्यांनी आजपर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष का केले? याचा अर्थ दुध संकलन करणार्या केंद्र चालकापेक्षाही दुध प्रक्रिया व पॅकिंग करणारा संस्था चालक यात महत्वाचा दोषी आढळतो. त्याच्या आधारानेच सर्वसामान्य दुध संकलन केंद्र चालविणारे खोट्या अमिषाला बळी पडतात. संस्थाचालक सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळून लाखोची माया कमावतात. त्यांच्यावर कारवाई होणे खरे गरजेचे आहे. काल झालेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत अहमदनगर सहाय्यक आयुक्त व्ही. एम. ठाकूर, सहाय्यक आयुक्त के.जी. गोरे, नाशिकचे एस.के. पाटील व यु.आर. सूर्यवंशी यांनी सहभाग घेत दिवसभरात ही कार्यवाही पूर्ण केली. या कारवाईने परिसरातील इतरही दुध चालकांचे धाबे दणाणले असून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या या संस्था चालकावर काय कठोर कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.