Breaking News

संत विचाराने मार्गक्रमण झाल्‍यास सामाजिक एकोपा टिकवून राहील : विखे


लोणी।प्रतिनिधी :- आपल्‍याला लाभलेला संत परंपरेचा वारसा हा खूप मोठा आहे. संतांनी जातीभेदाचे समूळ उच्‍चाटन करण्‍याचे विचार दिले. या विचारानेच मार्गक्रमण झाल्‍यास समाजातील एकोपा टिकवून ठेवण्‍यास मदत होईल, असा विश्‍वास जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे यांनी व्‍यक्‍त केला.

लोणी खुर्द येथे संत नरहरी सोनार यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्त लोणी येथील श्री. संत नरहरी महाराज सांस्‍कृतीक मंडळाच्यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

त्या म्‍हणाल्‍या की, अनेक वर्षांची संत परंपरा जोपासण्‍याचे काम हे समाजातील विविध घटक करत असतात. संत विचारांची ही परंपरा खूप मोठी आहे. वारकरी सांप्रदायाच्‍या माध्‍यमातून संतांचा संदेश हा समाजाला मिळत असतो. अध्‍यात्मिक शिकवणूकीतूनच समाज घडत असतो. जातीभेद, उच्‍च नीच अशा कोणत्‍याही गोष्‍टींना संतांच्‍या विचारात थारा नाही. सध्‍याची सामाजिक परिस्थिती पाहीली तर संतांच्‍या विचारांना आपण कुठेतरी मूठमाती देतोय का, असा प्रश्‍न निर्माण होतो. संतांची जयंती आणि पुण्‍यतिथी ही केवळ अभिवादन करण्‍यासाठीच नाही तर त्‍यांच्‍या विचारांनी मार्गक्रमण करण्‍याचा संकल्‍पाचा दिवस ठरावा.

याप्रसंगी लोणी बुद्रुकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, उपसरपंच अनिल नानासाहेब विखे, राम मैड, राम डहाळे, गणेश मैड, शाम मिळास, हरिष माळवे, रविंद्र मैड, योगेश लोळगे, नितीन मैड, देवराम माळवे, संजय मिसाळ, डॉ. बाविस्‍कर, दत्‍तात्रय लोळगे, पांडूरंग शेवंते, मदनराव डाळे, हरिष मैड आदींसह मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.