Breaking News

जामखेडच्या अभिलेख कक्षाला दोन दिवसांपासुन कुलूप


येथील जुन्या तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या अभिलेख कक्षाला मागील दोन दिवसांपासुन कुलूप असल्याने तालुक्यातून संबंधित कार्यालयाकडे काम घेवून येणार्‍या नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. याकडे तहसिलदार यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा दिवसभर तहसिल आवारात होत आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्या तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या अभिलेख कक्षातून जुने फेरफार काढण्यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्ग दररोज मोठ्या संख्येने कार्यालयात येत असतात. मात्र मागील दोन दिवसांपासुन येथील क्लार्क अचानक बेमुदत रजेवर गेले असल्याने येथील कार्यालयाला कुलूप लागले आहे. तहसिल कार्यालयाने जनतेची अडवणूक होऊ नये याकरिता पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असताना जाणिवपुर्वक जनतेची हेळसांड व्हावी यासाठी दुर्लक्ष केले जात आहे का? असा सवाल याठिकाणी नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. दरम्यान अभिलेख कार्यालयास कुलूप का याबाबत सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, येथील कार्यालयाची जबाबदारी ज्या क्लार्कच्या खांद्यावर आहे त्यांचे 8 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीतील सुमारे 14 महिन्यांचा पगारच प्रशासनाने केलेला नाही. काम करूनही पगार होत नसल्याच्या निषेधार्थ संबंधीत क्लार्क रजेवर गेल्याची माहिती समोर येत आहे. जोपर्यंत मागील पगार होणार नाही, तोपर्यंत कामावर हजर होणार नसल्याची भूमिका संबंधीत क्लार्कने घेतली असल्याची चर्चा तहसिल आवारात होत आहे. दरम्यान यासंबंधीची माहिती तहसिलदार विजय भंडारी यांना विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तालुका प्रशासनाच्या ढिसाळ अन् नियोजनशुन्य कारभाराचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. याबाबत तहसिलदार कधी गंभीर होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.