Breaking News

शिवरायांच्या जयघोषाने राजधानीही दुमदुमली

नवी दिल्ली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती- घोडे, मावळे, नऊवारीसाडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील मंडळी अशा सर्व लवाजम्यानिशी ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा गर्जनेने राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. सदनाच्या सभागृहात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन पाळणा केला. यानंतर छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. 


महाराष्ट्र सदनातून यावेळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारी समोर वेषभूषेतील अष्टप्रधान मंडळ आणि सांप्रदायिक भजन मंडळीचा सहभाग शोभून दिसत होता. ज्ञानोबा -तुकाराम या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादून गेले होते. ढोल-ताशे व झांज पथकात सहभागी झालेल्या मुली व तरूण मुले यांचा उत्साह शोभून दिसत होता. याच शोभायात्रेत दोरखंडावर विविध आसणं सादर करणार्‍या नऊवारीतील मुली आणि मल्लखांबाचे सादरीकरण करणारे मुल, मर्दाणी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थीही मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. खास मराठी पेहरावातील या विद्यार्थ्यांनी लेझिम वर सर्वांना ठेका धरायला लावला. महाराष्ट्र सदनापासून निघालेल्या शोभा यात्रेचा समारोप येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर झाला. 
संसदभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आज सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, छत्रपती संभाजी राजे आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.