Breaking News

मराठीच्या जन्मस्थानी मराठी विद्यापीठची मागणी


नेवासा/शहर प्रतिनिधी/- मराठी भाषेचे जन्मस्थान असलेल्या नेवासा येथील तीर्थक्षेत्राकडे शासनाचे दुर्लक्ष होत असले तरी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा व मराठीच्या जन्मस्थानी मराठी विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी मंगळवार,२७ फेब्रुवारी रोजी नेवासा तहसीलदारांना मराठी भाषाप्रेमींनी निवेदन दिले.

संस्कृती युवा प्रतिष्ठान, कुकाणा. या संस्थेचे अध्यक्ष मुकुंद अभंग, शब्दगंध साहित्य संमेलनाचे प्राध्यापक भाऊसाहेब सावंत, कॉमरेड बाबा आरगडे, प्रेस क्लबचे गुरुप्रसाद देशपांडे, साहित्यप्रेमी राजेंद्र चौधरी, पत्रकार अनिल गर्जे, मकरंद देशपांडे, दीपक धनगे व इतर कार्यकर्त्यांनी नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांना सदरचे निवेदन दिले.

संस्कृती युवा प्रतिष्ठानने २७ फेब्रुवारी २०१५ रोजी मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर मागील वर्षी २७ फेब्रुवारीला प्रेस क्लब व संस्कृती युवा प्रतिष्ठानने याच मागणीसाठी नेवासा तहसीलसमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. या उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठींबा देत उपोषणात सहभाग नोंदवला होता. ज्ञानेश्वरीच्या रुपाने मराठी भाषेची निर्मिती नेवाशात झाली आणि संत ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणाचे पसायदान याच भूमीमध्ये मागितले. त्यामुळे नेवाशातील पैस खांबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांबरोबरच मराठी साहित्यिक व विचारवंत दर्शनाला येत असतात. त्यामुळे येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी संस्कृती युवा प्रतिष्ठानने केलेली आहे.