शेवगांवचा आदर्श पाथर्डीने घेऊन शहराचा श्वास मोकळा करावा!
पाथर्डीतील वीर सावरकर मैदानावर फार पुर्वीपासून आठवडे बाजार भरत असायचा. कालांतराने या मैदानाच्या कडेने नगरपालिकेने गाळे निर्माण केले. तसेच बाजार ओटेही बांधले. अशा सर्व सुविधायुक्त व प्रशस्त बाजारतळ उपलब्ध असताना काही भाजीविक्रेत्यांनी हळूहळू जुन्या पंचायत समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. धामणगांव रोडचा गळा त्यापुर्वीच घोटला गेला होता. त्याचा त्रास, गुगळे हॉस्पिटलपुरताच सिमीत असल्याने फारसा जाणवत नव्हता. भाजीविक्रेत्यांनी जुन्या पंचायत समितीला घेरल्यावर मात्र हाच त्रास सार्वजनिक झाल्याने त्याची तीव्रता वाढली. कालांतराने भीड चेपल्यानंतर भाजीविक्रेत्यांनी नाईक चौकापर्यंत पथारी पसरण्यास सुरुवात केली. आणि तेथून पुढे पाथर्डीकरांचा जीव कासावीस व्हायला सुरुवात झाली.
या चौकाशेजारीच जुने बसस्थानक असून ते इतर वाहनांचा बायपास म्हणून उदयास आले आहे. लहानमोठ्या व चारचाकी अवजड वाहनांबरोबरच मोटारसायकलस्वार बिनदिक्कत या बसस्थानकाचा बायपास म्हणून वापर करतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना पराकोटीचा अडथळा निर्माण होतो. जीव मुठीत घेऊन प्रवाशी वावरत असताना त्यांच्यावर झडप घालण्यासाठी खिसेकापूंना व महिला प्रवाशांचा विनयभंग करण्यासाठी टवाळखोरांना आपोआपच पुरक वातावरण निर्माण होते. इतर दिवशी ठीक परंतु बुधवारी मात्र या बसस्थानकावर एकच कल्लोळ निर्माण होतो. आणि आलेले पाहुणे जाताना पाथर्डीचा हा आदर्श इतिहास सोबत घेऊन जातात. आता तर नगर रोडवरही भाजीविक्रेते पथारी मांडू लागल्याने कळसच झाला आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकातून बस व इतर वाहने रोडवर येताना त्यांना वळसा घेता येत नसल्याने, तालुक्याच्या पुर्व भागातील नगरकडे जाणारी वाहने आपोआप अडकली जाऊन रहदारी ठप्प होते. काही वेळा या भाजीविक्रेत्यांना मुख्य बाजारतळाकडे पिटाळण्यात आले. परंतु पालिका प्रशासनाचा तो फक्त आरंभशूरपणाच सिद्ध झाला. कारण कालांतराने परिस्थिती परत पुर्वपदावर आली. त्यामुळे मेटाकुटीस येऊन व्यवस्थेला शिव्या हासडत कसातरी बुधवार मावळतो. आणि पुढच्या बुधवारी परत त्याच त्रासाला सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करुन आया-बहिणी बाजारच्या थैल्या घेऊन मुकाटपणे बाजार करतात.
पालिका प्रशासन, पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने आता शेवगांवचा आदर्श घेऊन लोकांना दिलासा द्यायला हवा. परंतु नको तितके सहनशील, नको तितके मृदूभाषी, नको तितके सालस नगराध्यक्ष आणि अगदी याऊलट स्वभाव असलेल्या मुख्याधिकाऱ्यांचे याविषयी संगनमत होणे जवळजवळ दुरापास्तच असल्याने हे होईलच अशी अपेक्षा बाळगण्यात काही एक अर्थ नाही. चोर आणि सावांना समान न्याय देणाऱ्या पोलिस निरीक्षकांची बदली झाली असून, त्यांच्या जागी राकेश मानगावकर हे तडफदार पोलीस निरीक्षक डेरेदाखल झाले असून त्यांना स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळेच नागरिकांना या हालअपेष्टांतून मुक्ती मिळण्यासाठी, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल व तहसीलदार नामदेव पाटील यांनाच नवस करावा लागेल !