Breaking News

मनोरा अपहाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी मोजमाप पुस्तिकेची चोरी प्रज्ञा वाळकेंवर संशयाची सुई ; पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मुंबई/विशेष प्रतिनिधी :  बहुचर्चित मनोरा आमदार निवास अपहार प्रकरणाची चौकशी अंतिम चरणात असतांना अपहाराची सिध्दता करण्यात मोलाचे योगदान देऊ शकतील अशा मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याने भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या संबंधित अभियंत्यांवरचा संशय वाढला आहे. हे अपहार प्रकरण सुरूवातीपासून दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या, अपहार प्रकरणातील मुख्य संशयीत तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या भुतकाळातील हालचालींची शहनिशा करून भविष्यातील हालचालींवर नजर ठेवण्याचे आणखी एक काम दक्षता पथकाच्या नशिबी आले आहे. दरम्यान या मोजमाप पुस्तिका गहाळ प्रकरणी आमदार निवास इमारत अपहार प्रकरणी चर्चेत असलेल्या शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेंसह याच प्रकरणात निलंबित झालेल्या दोन सह अभियंत्यांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे आली आहे.


मनोरा आमदार निवास भ्रष्टाचार प्रकरण गेल्या 8 महिन्यापासून राज्यात गाजत आहे. तक्रारदार चरणभाऊ वाघमारे हे सत्ताधारी भाजपाचेच आमदार असल्याने राज्यात वेगळ्या पण गुढ चर्चेला उधाण आले आहे. मनोरा आमदार निवास इमारतीचे उद्घाटन तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकाराने दिनांक 24 एप्रिल 1997 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे तसेच बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात केले. येत्या 24 एप्रिल 2018 ला या इमारतीला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. गिनिज बुकात नोंद व्हावी अशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर इमारतीचे काम केले.
गेल्या तीन वर्षात मनोरा आमदार निवास या इमारतीच्या देखभाल दुरूस्ती पोटी किमान 25 कोटी रुपयांचा खर्च कागदोपत्री दाखविण्यात आला. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कामे करण्यात आली नाहीत. सन 2014-15, 2015-16, 2016-17, 2017-18 या आर्थिक वर्षात या इमारतीवर करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील माहिती अधिकारात भाजपाचे तुमसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी मिळवून त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांना सखेद आश्‍चर्याचा धक्काच बसला. उक्त गंभीर प्रकरणी आ.चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यानीशी दि. 27 जुलै व दि. 12 सप्टेंबर 2017 रोजी लेखी तक्रार करुन संबंधित दोषी अधिकार्‍याना तात्काळ निलंबित करावे, संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशा आशयाची मागणी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश निर्गमित केले.

मुख्यमंत्र्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रधान सचिवांनी दि. 27जुलै 2017 च्या तक्रार अनुषंगाने मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी तसेच 12 सप्टेंबर 2017 च्या तक्रार अनुषंगाने मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना आदेशीत करून चौकशी अहवाल देण्यास सांगितले. त्याबर हुकूम मुंबई साबांचा पहिला अहवाल 5 आक्टोबर 2017 रोजी सादर झाला. या वस्तुनिष्ठ चौकशी अहवालावरून कामे न करता बिले काढून शासकीय निधीचा अपहार केल्याचा ठपका श्रीमती वाळके, भुषण फेगडे, केशव धोंडगे यांच्यावर ठेवला. आणि फेगडे - धोंडगे या सह अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. या निर्णयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने समान न्यायाचा कायदा धाब्यावर बसवून शाखा अभियंता, उप अभियंता यांना लागलीच निलंबित केले. परंतु या घोटाळ्यातील प्रमुख मास्टरमाइंड दोषी अधिकारी प्रज्ञा वाळके यांना अभय देऊन त्यांची अकार्यकारी पदावर नियुक्ति केली. असा निषेधाचा सुर सार्वजनिक बांधकाम खात्यात उमटू लागला. त्याचा धागा पकडून तसेच प्राप्त अधिकृत माहितीच्या आधारावरून आ. चरणभाऊ वाघमारे यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या अपहारावर सबळ पुराव्यानिशी अभ्यासपुर्ण विवेचन केले. मनोरा आमदार निवास प्रकरणी बांधकाम विभागाची बांधकाम मंत्र्यासमोर लक्तरे विधानमंडळाच्या वेशीवर टांगली. 


इकडे भ्रष्टाचाराच्या दलदलीत पूर्ण अडकल्याने सुटका होणे शक्य नाही हे लक्षात आल्याबरोबर तपास अधिकारी चामलवार यांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करायचे नाही. ते साईट तपासणीस आल्यास एकदाही उपस्थित न राहणे, त्यांना तपास कामी लागणारी कागदपत्रे न देणे, असा पवित्रा प्रज्ञा वाळके यांनी घेतला. त्याही परिस्थितीत तपास सुरू ठेवण्याचे शिवधनुष्य चामलवार यांनी उचलले. मात्र या प्रकरणातील मास्टरमाईंड प्रज्ञा वाळके यांनी या प्रकरणाशी संबंधित तब्बल 15 मोजमाप पुस्तिका गहाळ करण्याचे धाडस दाखवले. हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात असून तपास कामी लागणारी 15 मोजमाप पुस्तकें या तिन्ही संबधित अभियंत्यांनी चोरुन नेल्याची धक्कादायक बाब चामलवार यांनीच उघड केली आहे. (क्रमशः)

प्रज्ञा वाळकेंवर संशयमनोरा आमदार निवास अपहार प्रकरणाशी संबंधीत गहाळ पंधरा मोजमाप पुस्तिका संदर्भात शहर इलाखा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, सह अभियंता भुषण फेगडे, केशव धोंडगे यांच्यावर संशयाच्या नजरा खिळल्या आहेत. तथापी दोन्ही सह अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याने 5 आक्टोबर पासून या दोघांचा शहर इलाखा साबां कार्यालयातील दस्तऐवजाशी दुरदुरपर्यंत संबंध येणे शक्य नसल्याने मोजमाप पुस्तिका गहाळ होण्याच्या घटनेशी प्रज्ञा वाळके यांच्यावर संशयाच्या नजरा खिळल्या आहेत.