Breaking News

भारिप बहुसंघाच्या प्रदेशाक्षपदी बुलडाण्याचे अशोकभाऊ सोनोने

मुंबई ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला रिपब्लिक समाज घडवून भारताला महासत्ता बनविण्याचा वारसा चालविणार्‍या भारतीय रिपब्लिकन महासंघाने आपल्या ढाच्यासाच्यात आमुलाग्र बदल करून जुन्या जाणकार मंडळींसोबत नवतरूणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा बुलडाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष बुलंद तोफ अशोकभाऊ सोनोने यांच्या खांद्यावर देऊन औरंगाबादचे अमित भुईगळ यांच्यावर जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अडॅ. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात जिल्हा पातळीवर महत्वाचे बदल करण्यात येणार असून काही नवीन चेहर्‍यांना विशेषतः तरूण चेहर्‍यांना वाव दिला जाणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुचित केले. प्राचार्य म.ना.कांबळे यांना विद्वत्त सभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


बहुजन, मागासवर्गीय चळवळीत सोशल इंजिनीअरिंगचा ‘अकोला पँटर्न’ गाजविणार्‍या भारिप बहुजन महासंघाने पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यासाठी कंबर कसली आहे. ओबीसींची मोट बांधण्याच्या प्रयत्नानंतर आता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीचा सर्वसमावेशक विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील पक्ष कार्यालयात महत्वपुर्ण बैठक झाली आहे. त्यानुसार आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 
नव्या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा बुलडाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांच्याकडे देण्यात आली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीत जनरल सेक्रेटरी कुशलभाऊ मेश्राम, अमितभाई भुईगळ यांच्यासह अनेक नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यासाठी व्युव्हरचना आखणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणारे बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघही ‘अपग्रेड’ होत आहे. अकोला जिल्ह्यात ओबीसी मेळावा घेऊन भारिपने ओबीसी समाजबांधवांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुका लक्षात घेता भारिप बहुजन महासंघ राज्यातही आपली ताकद नव्याने निर्माण करण्यासाठी सज्ज झाला असल्याने महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षासाठी ही धोक्याची घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.