Breaking News

प्लास्टिकची बंदी कागदावर, ढीग गावभर

रत्नागिरी, दि. 20, फेब्रुवारी - 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र दैनंदिन जीवनात सर्रास प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांसह पिशव्यांचा खच सर्वच रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पडल्याचे पाहिल्यानंतर ‘प्लास्टिकची बंदी कागदावर, ढीग गावभर’ असेच काहीसे चित्र सर्वत्र दिसत आहे.


काही वर्षांपूर्वी कापडी पिशव्यांना महत्त्व होते. काळाच्या ओघात त्यामध्ये बदल होऊन प्लास्टिकला महत्व प्राप्त झाले. ‘वापरा आणि फेका’ या नव्या सूत्रामुळे प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांच्या तुलनेत महत्त्व प्राप्त झाले. भाजीपाला, बेकरीतील पदार्थ, औषधे, विविध प्रकारचा बाजार, जेवणाचे पार्सल, नाश्त्याचे पार्सल यांसाठी प्लास्टिक पिशव्यांचाच वापर होताना दिसत आहे. त्याच्या जोडीने मोठे समारंभ वा धार्मिक कार्यक्रमांमध्येही विविध प्रकारच्या पत्रावळी, पाण्याचे ग्लास, चहाचे कपही प्लास्टिकचेच वापरले जात आहेत. पर्यावरणाला घातक ठरणारा प्लास्टिकचा वापर मानवी जीवनासाठीही घातक असल्याचे बोलले जात असले तरी प्लास्टिकचा वापर मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. ते नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यातून प्लास्टिक वर्षानुवर्षे टिकून राहते. परिणामी दररोज प्लास्टिकचा खच वाढतच चालला आहे. रस्ते, नदी-नाल्यांचा परिसर वा मोकळी जागा दिसल्यास तेथे सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा खच पडल्याचे दिसते. विशिष्ट मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कायद्याने बंदी घातली असली तरी सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांमधून टाकले जाणारे खाद्यपदार्थ वा वस्तू खाण्यासाठी भटकी जनावरे, गाई, म्हशींचा वावर वाढला आहे. खाद्यपदार्थांसोबतच प्लास्टिक पिशव्या त्यांच्या पोटात जात असल्याने त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. वेळप्रसंगी त्यांचा मृत्यूही ओढवतो. शहरातील अनेक भटकी जनावरे यापूर्वी प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने दगावली. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या भटकी जनावरे, गाईम्हशींसाठीही घातक ठरत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आदींनी नदी, नाले तुंबल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे नदी-नाले तुंबल्याने पूरसदृश स्थितीही निर्माण होते.
विघटन होण्यास शेकडो वर्षे लागत असलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अलीकडे केला जात आहे. त्यादृष्टीने स्थानिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्राधान्याने विचार केल्यास प्लास्टिकचा ठिकठिकाणी दिसणारा खच कमी होईल आणि त्यातून अन्य विकासात्मक कामेही मार्गी लागतील. तूर्त तरी ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा दिस असल्याने प्लास्टिकवरील बंदीचा कायदा अमलात येणे कठीण वाटत आहे.