Breaking News

हॅपी एग्ज ब्रॅण्ड खाली विक्रीची व्यवस्था करण्यात येऊन ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - बंदिस्त कोंबडी पालनामधून उत्पादित होण-या अंड्यापेक्षा मोकळ्या वातावरणातील कोंबडी पालनातून उत्पादित होणारी अंडी अधिक पौष्टीक असतात. यासाठी चांदा ते बांदा योजनेखाली कुक्कुट ग्राम संकल्पनेतून महिला बचत गटांच्या सदस्यांना खुल्या कोंबडी पालनासाठी सहाय्य केले जाणार असून या मधून उत्पादित होणारी अंडी हॅपी एग्ज ब्रॅण्ड खाली विक्रीची व्यवस्था करण्यात येऊन ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी निर्माण केली जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना केले.


ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलण्याची सक्षमता चांदा ते बांदा या अभिनव योजनेत असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, कृषी यांत्रिकीक रण, मधूमक्षिका पालन व रेशिम उत्पादन, कृषी पर्यटन, खेकडा पालन, शोभिवंत मासे, कांदळवनातील खेडका पालन, केज फिशिंग आदी योजनांव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. यासाठी आजच्या परिसंवादानंतर इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करावी व या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला दररोज एक लक्ष दहा हजार अंड्यांची गरज आहे. हीच अंडी आपण आपल्या जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाव्दारे निर्माण करु शकतो. यासाठीच चांदा ते बांदा योजनेखाली बचत गटांच्या माध्यमातून कुक्कुट ग्राम ही योजना राबविण्यात येणार आहे. आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले आहेत पण चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाव्दारे संपन्नतेची व आर्थिक स्वातंत्र्याची नवी पहाट पाहण्याचे स्वप्न निश्‍चित पूर्ण करु शकतो असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.