Breaking News

दिगंबर गोरेचा खुनच; दोघांना अटक


नेवासा / शहर प्रतिनिधी/- तालुक्यातील वरखेड येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी दिगंबर गोरे याचा मृतदेह आढळला होता. पोलीस तपासानंतर गोरे याचा खुनच केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
याबाबत आबासाहेब मारुती गोरे (वय ६०) रा. वरखेड ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात म्हंटले आहे की, मी व माझी पत्नी लताबाई, मुलगा शिवाजी, सून सौ देवका, नात, नातू असे आम्ही एकत्र राहतो. मला आणखी चार भाऊ असून मी सर्वात मोठा आहे तर देविदास, दत्तात्रय, दिगंबर, राजेंद्र असे आम्ही पाच भाऊ आहेत. त्यात दिगंबर (वय ५१) हा वगळता सर्वांची लग्ने झालेली आहेत. चार नंबरचा भाऊ दिगंबर हा आठवीत असल्यापासून आमचे गावात राहणारी मैनाबाई पोपट गंगूले या बाईकडेच राहण्यास होता. मैनाबाई हिला नवरा तसेच मुलं बाळ काही नव्हते. त्यामुळे मयत दिगंबर हा तिच्याच घरी राहत होता. तो मोठा झाल्यानंतर त्यास दारूचे व्यसन लागले. मैनाबाई ही तिची आई व भाऊ दिगंबर यांच्यासह वरखेड गावातच तिच्या स्वतःच्या शेतात रोडटच राहण्यास गेला. मैनाबाई हिच्या भावाचा मुलगा गंगाधर भागाजी कुंढारे हा देखील गेले काही दिवसांपासून मैनाबाई हिच्याकडे राहण्यास असून तोच सर्व व्यवहार सांभाळतो. 

गावालगतच साखर कारखाना होत आहे. मैनाबाई यांच्या जमिनी शेजारीच कारखाना होत असल्याने जमिनीला भाव आला आहे. यामुळे गंगाधर कुंढारे हा सतत मैनाबाईकडे येत असे. त्यामुळे मैनाबाई व गंगाधर या दोघांना मयत दिगंबर याची अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हे दोघे दिगंबरला नेहमी मारहाण करीत असे. दि २४ फेब्रुवारीला मैनाबाई माझ्या घरी येऊन दिगंबर त्रास देतोय समजून सांगा असे मैनाबाईने सांगितले. यापुर्वी आमच्या घरी मैनाबाई कधी आली नाही आणि दिगंबरशी जास्त संबंध नसल्याने उद्या बघू असे मैनाबाईला सांगितले. दि २५ फेब्रुवारीला मैनाबाईच्या घरी गेलो असता दिगंबर हा तिच्या घरासमोरील टपरीजवळ मयत अवस्थेत आढळून आला. मानेला कशाने तरी आवळण्याची खून स्पष्ट दिसत होती तर नाकातून व तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. मयत दिगंबर याचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन सोमवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टपरीजवळ असलेल्या शेतजमिनीचा भाव वाढल्याने दिगंबर याचा अडसर होऊ नये म्हणूनच दिगंबरचा खून केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरून नेवासे पोलिसांनी मैनाबाई पोपट गंगूले व तिचा भाचा गंगाधर भागाजी कुंढारे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेली मैनाबाई गंगूले हीचा गावात बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय आहे. मयत दिगंबर याच्यावर मैनाबाई हिच्याच घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपीना न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.-